

विद्याविहार पूर्व-पश्चिम उड्डाणपुलाला स्व. प्रमोद महाजन यांचे नाव द्यावे
माजी मंत्री प्रकाश महेता यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी
घाटकोपर, ता. ५ (बातमीदार) ः घाटकोपरमधील नागरिकांच्या दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या विद्याविहार पूर्व-पश्चिम उड्डाणपुलाला ईशान्य मुंबईचे माजी खासदार व दिवंगत भाजप नेते स्व. प्रमोद महाजन यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी महाराष्ट्राचे माजी गृहनिर्माण मंत्री आणि घाटकोपरचे माजी आमदार प्रकाश महेता यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन निवेदन साद केले.
प्रकाश महेता १९९० मध्ये प्रथमच घाटकोपरचे आमदार म्हणून निवडून आल्यानंतर परिसरातील नागरिकांची मागणी लक्षात घेऊन विद्याविहार पूर्व-पश्चिम जोडणाऱ्या उड्डाणपुलासाठी महापालिका तसेच रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू केला होता. दरम्यान, विविध प्रशासकीय परवानग्या तसेच केंद्र व राज्यातील तत्कालीन वेगवेगळ्या सरकारांमुळे या प्रकल्पाला मंजुरी मिळण्यास अनेक अडथळे निर्माण झाले.
दरम्यान, १९९६ मध्ये स्व. प्रमोद महाजन ईशान्य मुंबई मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आल्यानंतर त्यांनीही या उड्डाणपुलाच्या प्रकल्पासाठी पाठपुरावा केला. त्यामुळे या प्रकल्पाच्या उभारणीच्या प्रक्रियेत महेता आणि महाजन यांच्या प्रयत्नांचा सहभाग राहिला.
२०१४ मध्ये केंद्र व राज्यात भाजपचे सरकार सत्तेवर आल्यानंतर प्रकाश महेता राज्याचे मंत्री झाले. त्यानंतर त्यांनी या प्रकल्पाला गती देण्यासाठी आराखडे, रेल्वे विभागाच्या परवानग्या आणि निधी मंजुरीच्या प्रक्रियेसाठी पाठपुरावा केला. २०१७ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उड्डाणपुलाचे भूमिपूजन करण्यात आले आणि प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली.
सुमारे २४ वर्षांच्या पाठपुराव्यानंतर विद्याविहार पूर्व-पश्चिम उड्डाणपुलाचे काम आता अंतिम टप्प्यात आले असून, लवकरच हा पूल नागरिकांसाठी खुला होण्याची अपेक्षा आहे. या पार्श्वभूमीवर ईशान्य मुंबईचे माजी खासदार आणि केंद्रीय मंत्री स्व. प्रमोद महाजन यांच्या स्मरणार्थ या उड्डाणपुलाला त्यांचे नाव देऊन त्यांचा सन्मान करण्यात यावा, अशी विनंती प्रकाश महेता यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.