विवस्त्र करुन धिंड काढलेल्या महिलेला अखेर न्याय; माजी संरपंचासह नऊ जणांना सक्तमजुरी

विवस्त्र करुन धिंड काढलेल्या महिलेला अखेर न्याय; माजी संरपंचासह नऊ जणांना सक्तमजुरी

सोलापूर : अवैध व्यवसायाबाबत पोलिसांना माहिती दिल्याचा राग मनात धरून महिलेस रस्त्यावर अडवून विवस्त्र करून मारहाण करून धिंड काढल्याप्रकरणी तत्कालीन सरपंचासह नऊ आरोपींना जिल्हा व सत्र न्यायाधीश डी. के. अनभुले यांनी पाच वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. ही घटना 11 मार्च 2006 ला तेलगाव सीना (ता. उत्तर सोलापूर) येथे घडली होती. 13 वर्षे हा खटला चालला. 

तत्कालीन सरपंच बाळासाहेब सिद्राम माने (वय 55), शिवाजी लक्ष्मण पाटील (वय 49), बिभीषण लक्ष्मण पाटील (वय 47), अरुण बंडा जाधव (वय 35), कमलाकर श्‍यामराव पाटील (वय 40), नितीन कोंडिबा पाटील (वय 30), गणपत नामदेव जाधव (वय 43), पार्वती ऊर्फ पारूबाई बाळू पाटील (वय 30) आणि सुबाबाई ऊर्फ सुभद्रा दिगंबर घाटे (वय 55, सर्व रा. तेलगाव सीना, ता. उत्तर सोलापूर) अशी शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. 

गावातील दारूविक्री व इतर अवैध व्यवसायासंदर्भात पोलिसांत तक्रार दिल्याच्या संशयावरून पीडित महिलेला आरोपींनी मारहाण केली होती. त्याबाबत महिलेने पोलिसांत तक्रार दिली होती. 11 मार्च 2006 रोजी सकाळी नऊच्या सुमारास तक्रारी अर्जाच्या चौकशीसाठी पीडित महिला मुलासह निघाली होती. या वेळी तेलगाव एसटी स्थानकावर सर्व आरोपींनी महिलेला अडवले. तिला विवस्त्र केले. तसेच तिची एसटी स्थानकापासून गावातील चावडीपर्यंत विवस्त्र धिंड काढली होती. तसेच तिच्या मुलाला काटीने व लाथाबुक्‍याने मारहाण केली. या घटनेची वाच्यता केल्यास जाळून मारण्याची धमकी दिली होती. या घटनेची फिर्याद पीडित महिलेने सोलापूर तालुका पोलिस ठाण्यात दिली होती. त्या वेळी ऍट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला होता. तत्कालीन उपविभागीय अधिकारी नंदकुमार ठाकूर, नारायण डफळे यांनी तपास करून न्यायालयामध्ये दोषारोपपत्र सादर केले होते. 

खटल्याच्या सुनावणीवेळी एकूण 16 साक्षीदार तपासण्यात आले. पीडित महिला आणि तिच्या मुलाची साक्ष महत्त्वाची ठरली. आरोपीने केलेला गुन्हा हा गंभीर स्वरूपाचा असून समाजाच्या डोळ्यात अंजन घालणारा आहे. हे कृत्य समाजविघातक आहे. पीडित महिलेची व तिच्या मुलाची साक्ष सुसंगत असून विश्‍वासार्ह आहे, हा सरकारी वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने नऊ जणांना पाच वर्षे सक्तमजुरीची शिक्षा आणि प्रत्येकी हजार रुपये दंड ठोठावला. दंडापोटी वसूल होणारी रक्कम ही पीडित महिलेस देण्याचा आदेश न्यायालयाने दिला. या खटल्यात सरकार पक्षातर्फे ऍड. गंगाधर रामपुरे, ऍड. आनंद कुर्डूकर, मूळ फिर्यादीतर्फे ऍड. संजीव सदाफुले, ऍड. सिद्धांत सदाफुले यांनी तर आरोपीतर्फे ऍड. धनंजय माने यांनी काम पाहिले. 

तेलगाव सीनामध्ये 13 वर्षांपूर्वी घडलेल्या या घटनेमुळे तेव्हा महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा चर्चेला आला होता. विधानसभा आणि लोकसभेत याबाबत चर्चा झाली होती. पीडित महिलेस न्याय मिळावा यासाठी अनेक आंदोलने झाली. घटना घडल्यापासून आजअखेर पीडित महिलेस पोलिस संरक्षण आहे. घटनेच्या वेळी सध्याचे पोलिस अधीक्षक मनोज पाटील हे अप्पर पोलिस अधीक्षक म्हणून कार्यरत होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com