

०७६१६
इचलकरंजी : शहरात ठिकठिकाणी दिशादर्शक फलकांवर सर्रास जाहिराती लावल्या जात आहेत.
----------------
इचलकरंजीत दिशादर्शक फलकांवर जाहिराती
प्रशासनाचे दुर्लक्ष ः सूचना समजत नसल्याने वाहनधारकांना त्रास
ऋषीकेश राऊत : सकाळ वृत्तसेवा
इचलकरंजी, ता. २८ : शहराच्या अंतर्गत भागासह ठिकठिकाणी दिशादर्शक व माहिती फलक आहेत. तेथे हमखास जाहिराती लावल्या जात आहेत. त्यामुळे नागरिकांना कोणत्याही प्रकारची माहिती मिळत नसल्याचे चित्र शहरभर दिसत आहे. हे फलक म्हणजे फुकटात जाहिरात लावण्यासाठी हक्काची ठिकाणे बनली आहेत. प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत असून सध्या जाहिरातींचा हा नवा फंडा बळावत चालला आहे.
सर्वसामान्य नागरिकांना आणि वाहनचालकांना रस्त्यांची, चौकांची, महत्त्वाच्या स्थळांची माहिती मिळण्यासाठी शहरात दिशादर्शक फलक लावण्यात आले आहेत; मात्र या फलकांवरून नागरिकांना माहिती कमी; पण जाहिरातीच जास्त दिसत आहेत. बहुतांश ठिकाणी दिशादर्शक फलकांवर अनेक संस्थांनी अतिक्रमण केल्याने फलकांवरील मजकूर पूर्णपणे झाकला गेला आहे. शहरात एक नव्हे, तर बहुतांश ठिकाणी हे सर्रास पाहावयास मिळत आहे. दिशादर्शक व अंतरदर्शक फलकांवर जाहिराती चिकटवल्या असल्याने फलकांवरील सूचना किंवा पुढे काय आहे हे समजत नाही. याचा सर्वाधिक त्रास वाहनधारकांना सहन करावा लागत आहे.
शहरात सिग्नलवरही जाहिरात फलकांचे पेव फुटले आहे. सिग्नलवर वाहनधारक थांबल्यानंतर फुकटची जाहिरातबाजी होत असल्याने अनेकांनी अतिक्रमण करण्यास सुरुवात केली आहे. प्रशासन नागरिकांना वाहतुकीचे नियम, मार्ग याबाबत माहिती देण्यासाठी मोजक्या ठिकाणी फलक लावते; मात्र याच जागा हेरून या फलकांवर जाहिराती लावण्याचा सपाटा सुरू आहे. त्यामुळे बाहेरून येणाऱ्या वाहनांना सर्रास कारवाईस सामोरे जावे लागत आहे. अशा जाहिरात फलकांची कीड शहराबाहेरून शहराच्या अंतर्गत भागातही पसरत आहे. करदात्यांच्या पैशातून उभारलेल्या या फलकांचा दुरूपयोग होत असून शहर आणखी विद्रूप होऊ लागले आहे.
--------
प्रशासनाने कठोर कारवाई करावी
शहरातील झाडे, विद्युत पोल जाहिरातींनी व्यापले आहेत. या ठिकाणी तक्रारीनंतरही प्रशासन कारवाईसाठी जागे होत नाही. याचा फायदा घेत जाहिराती आता दिशादर्शक व माहिती फलकांच्या ठिकाणी आपली जागा भक्कम करत आहेत. अशा फुकटच्या जाहिरातींवर प्रशासनाने कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
-----
प्रशासनाने काय करावे?
*दिशादर्शक, माहिती व सूचना फलकांकडे लक्ष
* सीसीटीव्हीद्वारे जाहिराती लावणाऱ्यांवर नजर
* अतिक्रमणविरोधी पथकाकडून वारंवार तपासणी
* तक्रार आल्यास त्वरित निपटारा
* वेळोवेळी कायदेशीर दंडात्मक कारवाई
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.