"या' जिल्ह्यात "गोवर-रुबेला'त गैरव्यवहार? 

"या' जिल्ह्यात "गोवर-रुबेला'त गैरव्यवहार? 
Updated on

सोलापूर ः केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी "गोवर-रुबेला' आणि विश्‍वास अभियानाची मोठ्या प्रमाणात जनजागृती होण्यासाठी सोलापूर जिल्ह्याच्या आरोग्य विभागासाठी मोठी आर्थिक तरतूद केली होती. पण, आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी शासनाने सांगितलेल्या नियमाप्रमाणे तो निधी खर्च केला नाही. त्यामुळे त्या निधीमध्ये गैरव्यवहार झाला आहे का? याबाबतची विचारणा करणारा तारांकित प्रश्‍न अहमदपूरचे आमदार बाबासाहेब पाटील यांनी उपस्थित केला आहे. 

जिल्हा परिषदेचे सदस्य मदन दराडे यांनी याबाबत तक्रार आरोग्य विभागाकडे केली होती. मात्र, त्यांच्या या तक्रारीची गांभीर्याने दखल घेतली नव्हती. मात्र, आता हा प्रश्‍न विधिमंडळात उपस्थित होणार असल्याचे जिल्ह्याच्या आरोग्य विभागाचे धाबे दणाणले आहेत. याबाबतची माहिती दोन दिवसात देण्याच्या सूचना विधिमंडळ सचिवालयाने दिल्या आहेत. जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना हाताशी धरून या विषयात आर्थिक गैरव्यवहार केला आहे का? असाही प्रश्‍न यानिमित्ताने उपस्थित केला आहे. याबाबतची तक्रार जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे फेब्रुवारी 2019 मध्ये केली होती. मात्र, त्याबाबत फारसे गांभीर्याने घेतले नाही. या गैरव्यवहार प्रकरणाची चौकशी शासनाने केली आहे का? जर चौकशी केली असेल तर त्यामध्ये काय आढळून आले आहे? त्यामध्ये दोषी असणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांवर काय कारवाई करण्यात आली याची माहिती विधिमंडळ सचिवालयाने मागितली आहे. 

"गोवर-रुबेला'ची जनजागृती करण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी आला होता पण त्या निधीचा योग्य तो विनियोग झाला नसल्याची तक्रारही त्यावेळी करण्यात आली होती. विश्‍वास या अभियानामध्ये तर मोठ्या प्रमाणात अनियमितता करून या अभियानावरचा लोकांचा "विश्‍वास'च उडवून टाकला आहे. यामध्ये अधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार केला असल्याचेही श्री. दराडे यांनी "सकाळ'ला सांगितले. प्रत्येक तालुक्‍यात सरपंचांना प्रशिक्षण देण्यासाठी आठ-नऊ बॅचेस केलेल्या असायच्या मात्र, प्रत्यक्षात प्रशिक्षणासाठी सरपंचच गैरहजर राहात होते. त्यामुळे या अभियानाचा म्हणावा तितका उपयोग झाला नाही. याची नीटशी माहितीही सरपंचांपर्यंत पोचविण्यात आरोग्य विभाग अपयशी ठरल्याचेही यावरून स्पष्ट होते असेही श्री. दराडे यांनी सांगितले. याबाबत तक्रारी करूनही काहीच उपयोग झाला नव्हता. मात्र, आता श्री. पाटील यांनी याबाबत तारांकित प्रश्‍न उपस्थित केल्याने यातून सत्य ते उजेडात आल्याशिवाय राहणार नाही. यामध्ये दोषी असणाऱ्यांवर कारवाई होण्याची अपेक्षाही श्री. दराडे यांनी व्यक्त केली. 

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

A Legacy of Four Decades: Wrestling Tradition Alive in Mangalwedha
Wari Festival Update: Authorities Propose Exemption to Continue Ashadhi Wari Arrangements Smoothly
Action under MPDA
solapur
Marathi News Esakal
www.esakal.com