वारंवार खोदाईमुळे रस्त्याची दुरवस्था

वारंवार खोदाईमुळे रस्त्याची दुरवस्था
Published on

पिंपरी, ता. २९ : वारंवार रस्त्याची खोदाई केली जात असल्याने देहू-आळंदी रस्त्यावरील विठ्ठलवाडी ते तळवडे रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. कामानंतर खड्डे बुजविल्यानंतरही व्यवस्थित डांबरीकरण केले जात नसल्याने सर्वत्र खडी पसरली आहे. यामुळे वाहन चालक अक्षरश हैराण झाले आहेत.
देहू-आळंदी या तीर्थक्षेत्रांना जोडणारा हा मार्ग असून, एमआयडीसी व तळवडे आयटी पार्ककडेही हा मार्ग जात असल्याने या मार्गावर कायमच वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. दरम्यान, जलवाहिनी टाकण्याच्या कामासाठी सुरुवातीला महापालिकेकडून विठ्ठलवाडी ते तळवडे मार्गावर खोदाई करण्यात आली. काम झाल्यानंतर खड्डे बुजविण्यात आले. मात्र, त्यावर व्यवस्थित डांबरीकरण न केल्याने खडी सर्वत्र पसरत आहे. यामुळे दुचाकी घसरण्याच्या घटना घडतात. तसेच मोठ्या प्रमाणात धूळही उडते. अशातच आता पुन्हा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची पाइपलाइन टाकण्यासाठी तळवडे ते विठ्ठलवाडी या मार्गावरही खोदाई सुरू करण्यात आली. तसेच खंडेलवाल चौकाजवळ कमान उभारणीचेही काम अनेक दिवसांपासून सुरू असून त्यासाठी लोखंडी अँगल उभारण्यात आले आहेत. यामुळे हा रस्ता अरुंद झाला असून, वाहतूक कोंडी होत आहे. खोदाईचा राडारोडा रस्त्यावर पसरत असल्याने दुचाकी घसरण्याच्या घटना घडत असून, परिसरात धूळही उडत आहे.
दरम्यान, या मार्गावरून जाताना खराब रस्ता, मोठ्या प्रमाणात उडणारी धूळ, वाहतूक कोंडी यामुळे वाहन चालक अक्षरश हैराण होत आहेत. तरी या मार्गाची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.


चौकात मोठे खड्डे
तळवडेजवळील कॅनबे चौकातील रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत. हे खड्डे चुकविताना वाहन चालकांना कसरत करावी लागत आहे. या खड्ड्यात वाहन आदळून अपघाताच्या घटनाही घडत आहेत. या खड्यांची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे.

‘‘या मार्गावरून दररोज प्रवास करावा लागतो. मात्र, विठ्ठलवाडी ते तळवडे या मार्गावरील खोदाई, परिसरात उडणारी धूळ व वाहतूक कोंडी यामुळे हैराण होतो. खड्ड्यातून कसाबसा मार्ग काढावा लागतो. या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी.’’
- प्रतीक कदम, नागरिक

‘‘कॅनबे चौकातील खड्डे बुजविण्याचे काम लवकरच सुरू होणार आहे. तसेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे पाइपलाइन टाकण्याचे काम झाल्यानंतर तत्काळ रस्ता दुरुस्त करण्याबाबतच्या सूचना देण्यात आल्या आहेत.’’
- अमोल पाचंगे, कनिष्ठ अभियंता, महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com