संतप्त पालकांकडून ‘नो बार नियर स्कूल’चा एल्गार

संतप्त पालकांकडून ‘नो बार नियर स्कूल’चा एल्गार
Published on

बेलाजी पात्रे ः सकाळ वृत्तसेवा
हिंजवडी, ता. ३१ : आयटी नगरी माणच्या फेज तीन येथील एका प्रतिथयश शाळेच्या मुख्य प्रवेश‌द्वारासमोरच चक्क बार व मद्य विक्रीचे दुकान उघडण्यात आले आहे. या विरोधात शाळेचे पालक व सोसायटीचे रहिवासी आक्रमक झाले आहेत. हा व्यवसाय सुरू होण्याआधी विरोध करत लोकप्रतिनिधींसह सर्वांचे उंबरे झिजवले. मात्र, शून्य उपयोग झाला. त्यामुळे या सर्वांनी आता ‘नो बार नियर स्कूल’ हा लढा उभारला आहे.
शाळा परिसरात बार किंवा मद्यालयास परवानगी दिली जात नाही. मात्र, उत्पादन शुल्क विभागाने सर्व नियम धाब्यावर बसवून माण येथील एका इंग्रजी माध्यम शाळेच्या दारातच परवानगी दिल्याने आयटी परिसरात आश्चर्य व्यक्त केले जात आहे. शाळा आवारात वह्या-पुस्तके, स्टेशनरी, खेळणी व खाऊची दुकाने असण्याऐवजी थेट मद्यालय उघडण्यात आल्याने पालक व परिससरातील रहिवाशांत संतापाची लाट उसळली आहे.

उन्हाळी सुटीचा गैरफायदा
शाळांच्या उन्हाळी सुट्ट्या चालू असल्याचा गैरफायदा घेत मद्यालयाचे संपूर्ण काम करण्यात आले. शाळा सुरू होण्याआधी मुहूर्त साधत स्थानिक पुढाऱ्यांच्या हस्ते त्याचे उद्‍घाटन झाले. शाळा सुरू होताच ही बाब पालकांच्या लक्षात आली. सर्व पालकांनी एकत्र येत त्याला विरोध केला. दुकानासमोर निदर्शने केली. घोषणाबाजी केली. मात्र, संबंधित मालकाने उद्‍धट वर्तन करत माझ्याकडे रीतसर परवानगी आहे. तुम्ही इथे येऊन असा गोंधळ केल्यास मी पोलिसांत तक्रार देईल, अशी धमकीच दिली. त्यामुळे सर्व आंदोलक भोर-राजगड-मुळशीचे आमदार शंकर मांडेकर यांच्या कडे जाऊन याबाबत गाऱ्हाणे घातले.

खासदार सुळेंच्या ट्विटला कराची टोपली
खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या अधिकृत एक्स (पूर्वीचे ट्विटर) हँडलवरून या समस्येवर नुकतेच भाष्य केले होते. त्यांनी शाळेजवळील मद्य विक्री दुकाने मुलांवर हानिकारक परिणाम करू शकते. स्थानिक रहिवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण करू शकते, असे निदर्शनास आणून दिले आहे. त्यांनी जिल्हाधिकारी तसेच पालक मंत्री तथा उपमुख्यमंत्री मंत्री अजित पवार यांना या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन योग्य ती कारवाई करण्याची विनंती केली होती. मात्र, त्यावरही गांभीर्याने विचार होऊ शकला नही.


शाळेतील विद्यार्थी, शिक्षक व पालकांना बार आणि मद्य विक्रीच्या दुकानाने मोठा मानसिक व सामाजिक त्रास होत आहे. मुलांना शाळेत नेताना मद्यपानाचे दृश्य पहावे लागते. वारंवार होणाऱ्या गदारोळामुळे शाळेची शांतता भंग पावत आहे. मद्यपी ग्राहकांची गर्दी, राडारोड्यामुळे दुर्गंधी व कचरा परिसरात पसरतो. वर्दळीमुळे ध्वनी प्रदूषण, वाहतूक समस्येत वाढ झालीय. या सर्वांमुळे शालेय वातावरण धोकादायक व असुरक्षित झाले आहे.
- चेतन पगारे, अध्यक्ष, मेगा पॉलिस सनवे सोसायटी, माण

देशाचे उज्वल भविष्य असलेल्या विद्यार्थ्यांनी यातून काय बोध घ्यावा ?, त्यांच्या मनावर काय परिणाम होतील ? याबाबत सुज्ञ अधिकाऱ्यांनी विचार करावा. लोकप्रतिनिधी व उत्पादन शुल्क विभागाने या समस्येकडे गांभीर्याने पाहत शाळा परिसर शांत व सुरक्षित बनविण्यासाठी तत्काळ कारवाई करावी. मुलांच्या भवितव्यासाठी, त्यांचे शारीरिक, मानसिक आरोग्य व शिक्षण सुरळीत होण्यासाठी तळमळ दाखवावी.
- हरिणी कंदाला, पालक

धार्मिक स्थळे, शैक्षणिक संस्थांपासून ६० मीटर पायी अंतराच्या बाहेर मद्य विक्री दुकानांना परवानगी दिली जाते. ती देताना सर्व नियम अटींचे पालन केल्याची पडताळणी केली जाते. माणमधील त्या बार व वाईन शॉपीबाबत आमच्या विभागाकडे कोणतीही तक्रार नाही. नागरिकांनी ग्रामपंचायतीलाही तक्रार करावी. ग्रामपंचायतीने ग्रामसभेत ठराव केल्यास मान्यता रद्द करता येऊ शकते.
- सुजीत पाटील, उपअधीक्षक, उत्पादन शुल्क विभाग, पिंपरी चिंचवड

पालकांच्या मागण्या...
- बार व मद्य दुकानाचे लवकरात लवकर स्थलांतर करावे
- शाळा परिसरात व प्रवेश‌द्वाराजवळ म‌द्य विक्रीस बंदी घालावी
- मद्यविरोधी नियमा अंतर्गत योग्य ती कारवाई व दंडात्मक कार्यवाही करावी

WKD25A08745

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com