

Axis Account Plus and MSME Cash Management
esakal
सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना (एमएसएमई) अतिरिक्त रोकड अधिक कार्यक्षमतेने व्यवस्थापित करता यावी, या उद्देशाने ॲक्सिस म्युच्युअल फंडाने ‘ॲक्सिस अकाउंट प्लस’ हा डिजिटल मंच विकसित केला आहे. ‘ॲक्सिस अकाउंट प्लस’ची भूमिका, त्याची कार्यपद्धती आणि ‘एमएसएमईं’ना होणारे संभाव्य फायदे याबाबत ॲक्सिस म्युच्युअल फंडाचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी बी. गोपकुमार यांची ज्येष्ठ गुंतवणूक सल्लागार वसंत कुलकर्णी यांनी ‘सकाळ मनी’साठी घेतलेली ही खास मुलाखत...
प्रश्न : ‘ॲक्सिस अकाउंट प्लस’ सुरू करण्याची गरज का भासली?
गोपकुमार : भारतातील ‘एमएसएमई’ आणि कॉर्पोरेट परिसंस्था अशा टप्प्यावर आहे, जिथे व्यवसायाच्या वाढीसाठी अतिरिक्त खेळत्या भांडवलाचे व्यवस्थापन तितकेच महत्त्वाचे बनत आहे. अनेक व्यवसायांकडे येणे बाकी असलेली रक्कम, विक्रेत्यांची देयके, पगार, कर आणि खेळत्या भांडवलाच्या गरजा वेगाने बदलत असतात. या प्रकारची देणी भागविण्यासाठी ‘एमएसएमईं’कडे अतिरिक्त रोकड असते. परंतु, गुंतवणुकीची पारंपरिक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी विविध कागदपत्रांची आवश्यकता असते. ही प्रक्रिया वेळखाऊ असल्यामुळे अतिरिक्त रोकडीचे योग्य व्यवस्थापन अनेकदा होत नाही. ॲक्सिस म्युच्युअल फंडाने एएमएफआय, आरबीआय, कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय आणि एमएसएमई मंत्रालयाच्या आकडेवारीवर आधारित केलेल्या अंतर्गत संशोधनानुसार, चालू खात्यांमध्ये कंपन्यांची, ज्यात ‘एमएसएमईं’चाही समावेश आहे, अंदाजे २५ लाख कोटी रुपयांची रोकड पडून आहे. भारतात ३१ लाखांहून अधिक सक्रिय कॉर्पोरेट आणि एलएलपी असून, ८.६ कोटींहून अधिक एमएसएमई उद्यम आधारवर नोंदणीकृत आहेत. एवढी मोठी संख्या असूनही म्युच्युअल फंडांमधील संस्थात्मक खाती (फोलिओ) सुमारे १३.६ लाख आहेत. यावरून व्यवसाय विस्तारासाठी मोठी संधी उपलब्ध असल्याचे दिसते. मात्र, त्यासाठी उपलब्ध साधने आणि गुंतवणुकीची अंमलबजावणी अधिक सुलभ करणे आवश्यक आहे. भारतातील किमान दोन ते तीन टक्के ‘एमएसएमई’ आणि कॉर्पोरेटना लक्ष्य करून, मोठ्या प्रमाणावर या संधीचा लाभ घेणारी पहिली मालमत्ता व्यवस्थापन कंपनी (एएमसी) बनण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. आमचे वर्किंग कॅपिटल मॅनेजमेंट सोल्युशन ‘एमएसएमईं’ना व्यवसायासाठी अतिरिक्त असलेली रोकड सहज आणि कार्यक्षमतेने गुंतवण्याची सुविधा देते. या रकमेवर संभाव्य परतावा मिळवण्याची संधी उपलब्ध करून देणे, हा यामागील उद्देश आहे. ही उणीव भरून काढण्यासाठी ‘ॲक्सिस अकाउंट प्लस’ हा मंच तयार करण्यात आला आहे. हा मंच व्यवसायांना त्यांच्या रोकडसुलभतेच्या गरजा, गुंतवणुकीचा कालावधी आणि जोखीम घेण्याच्या क्षमतेनुसार (रिस्क प्रोफाइल) खेळते भांडवल व्यवस्थापित करण्यासाठी आणि पात्र ॲक्सिस म्युच्युअल फंडाच्या डेट व लिक्विड योजनांचे मूल्यांकन करण्यासाठी सोपा डिजिटल मार्ग उपलब्ध करून देतो.