

Circular Flow of Income
esakal
डॉ. अमेय खरे
आपण बचत केलेला पैसा बँका आणि इतर वित्तीय संस्थांकडे जमा होऊ शकतो. वित्तीय क्षेत्रं कर्ज किंवा वित्तपुरवठ्याच्या स्वरूपात ही बचत व्यवसायांना उपलब्ध करून देऊ शकतं. व्यवसाय हा पैसा नवीन यंत्रसामग्री, दुकान, कारखाना, तंत्रज्ञान किंवा इतर उत्पादनक्षम कामांसाठी वापरू शकतात. यालाच गुंतवणूक म्हटलं जातं.
रविवारी बाजारात गेल्यावर आपण एक हजार रुपये खर्च करतो. भाजी, किराणा, नाश्ता किंवा एखादी छोटी वस्तू घेतो. आपल्याला वाटतं आपले एक हजार रुपये गेले. पण अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने हा पैसा तिथेच थांबत नाही. आपण दिलेले पैसे दुकानदाराच्या उत्पन्नात रूपांतरित होतात. दुकानदार त्यातून घाऊक विक्रेत्याला पैसे देतो, कामगाराला पगार देतो, दुकानाचं भाडं भरतो किंवा नवीन माल खरेदी करतो. म्हणजे आपल्या खिशातून बाहेर पडलेला पैसा दुसऱ्याच्या खिशात प्रवेश करतो आणि तिथून पुन्हा पुढे जातो.
यातून अर्थशास्त्रातली एक महत्त्वाची संकल्पना समोर येते, ती म्हणजे उत्पन्नाचा परिपत्रक प्रवाह (सर्क्युलर फ्लो ऑफ इन्कम). या संकल्पनेचा साधा अर्थ असा, की अर्थव्यवस्थेत उत्पन्न आणि खर्च सतत एका क्षेत्रातून दुसऱ्या क्षेत्राकडे फिरत राहतात. हे समजून घेण्यासाठी सर्वांत आधी घरे आणि व्यवसाय यांच्यातला संबंध पाहू या. आपण ग्राहक म्हणून वस्तू आणि सेवा खरेदी करतो. त्यासाठी व्यवसायांना पैसे मिळतात. पण व्यवसायांना उत्पादन करण्यासाठी कामगार, जमीन, भांडवल आणि उद्योजकता लागते. उत्पादनासाठी लागणारे हे घटक मोठ्या प्रमाणावर घरांमधून उपलब्ध होतात. त्या बदल्यात घरांना वेतन, पगार, भाडे, व्याज आणि नफा अशा स्वरूपात उत्पन्न मिळतं. म्हणजेच एकाच व्यवहाराकडे दोन बाजूंनी पाहता येतं. घरांसाठी तो खर्च असतो, तर व्यवसायासाठी तो उत्पन्नाचा स्रोत असतो. व्यवसायासाठी कामगाराला दिलेला पगार हा खर्च असतो, पण त्या कामगारासाठी ते उत्पन्न असतं.