

Space Control Weapons
esakal
रोहित वाळिंबे
पृथ्वीच्या कक्षेत शत्रूचे उपग्रह आणि अवकाशीय यंत्रणा नष्ट करू शकणारी ‘अवकाश नियंत्रण शस्त्रे’ (स्पेस कंट्रोल वेपन्स) तैनात केल्याची घोषणा अमेरिकेने नुकतीच केली आहे. अवकाशात प्रत्यक्ष शस्त्रास्त्रे तैनात केल्याची जाहीर माहिती देण्याची अमेरिकेची ही पहिलीच वेळ आहे. या घोषणेनंतर अपेक्षेप्रमाणे चीन आणि रशियाने अमेरिकेच्या धोरणांवर जोरदार टीका केली आहे. अमेरिकेच्या या निर्णयामुळे आता इतर देशही उघडपणे अवकाशात शस्त्रे तैनात करण्यासाठी प्रयत्नशील होऊन नवी शस्त्रस्पर्धा पेटेल, असा इशारा आंतरराष्ट्रीय विश्लेषकांनी दिला आहे.
अमेरिकेच्या हवाई दलाचे वरिष्ठ अधिकारी ट्रॉय मेन्क यांनी नुकत्याच झालेल्या एका परिषदेत अमेरिकेने पृथ्वीच्या कक्षेत शत्रूच्या कारवायांना रोखणारी ‘अवकाश नियंत्रण शस्त्रे’ (स्पेस कंट्रोल वेपन्स) तैनात केली असल्याची माहिती दिल्यामुळे जगभर खळबळ उडाली आहे. मेन्क यांनी शस्त्रांच्या सुरक्षेचे कारण देत त्यांच्या तंत्रज्ञानाबाबतची तांत्रिक माहिती देण्यास नकार दिला. मात्र अमेरिकेच्या स्पेस फोर्सच्या स्पष्टीकरणानुसार, या अवकाश नियंत्रण श्रेणीत दोन प्रकारची यंत्रणा समाविष्ट असण्याची शक्यता आहे, एक म्हणजे शत्रूचे उपग्रह थेट नष्ट करणारी शस्त्रे आणि दुसरी म्हणजे स्फोट न घडवता लेझर किंवा सिग्नल जॅमर्सद्वारे उपग्रहांची संपर्कयंत्रणा निष्प्रभ करणारी यंत्रणा. या यंत्रणा अमेरिकी सैन्याच्या आणि उपग्रहांच्या सुरक्षेसाठी आक्रमक तसेच संरक्षणात्मक अशा दोन्ही भूमिका बजावू शकतात, असा दावा करण्यात येत आहे. दरम्यान, अमेरिकेची ही घोषणा चीन आणि रशियासारख्या प्रतिस्पर्धी देशांना अवकाशात आक्रमक पाऊल उचलण्यापासून रोखण्यासाठी दिलेला एक प्रतिबंधक इशारा मानला जात आहे.