

Vidarbha dairy revolution setback
esakal
बच्चू कडू - Bacchuprahar41@gmail.com
पश्चिम महाराष्ट्रात दुग्ध व्यवसाय हा छंद नव्हता; तर एक गरज होती. दुष्काळी परिस्थितीत जगण्यासाठी लोकांनी हा व्यवसाय स्वीकारला. सहकारातून दुग्ध व्यवसायाच्या क्रांतीचा आमचा प्रयोग अपेक्षेप्रमाणे यशस्वी झाला नाही; पण आम्हाला एक शिकवण देऊन गेला.
आम्ही जेव्हा अचलपूर विधानसभा मतदारसंघाचा विकास कसा करायचा, याचा विचार करत होतो तेव्हा एक गोष्ट आमच्या डोक्यात ठाम होती - विकास कागदावर होत नाही, तो प्रत्यक्षात घडवावा लागतो. म्हणून आम्ही काही निवडक सहकारी-कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांचा अभ्यास दौरा आयोजित केला. तो साधा नव्हता; तर आमच्या विचारांना दिशा देणारा होता.
संगमनेर, फलटण, राहुरी - पश्चिम महाराष्ट्रातील हा संपूर्ण पट्टा आम्ही अक्षरशः पिंजून काढला. मोठ्या डेअऱ्यांपासून ते छोट्या शेतकऱ्यांच्या गोठ्यांपर्यंत आम्ही भेटी दिल्या. लोकांच्या घरात जाऊन चर्चा केली. त्यांच्या आयुष्याचा अभ्यास केला. दुग्ध व्यवसाय त्यांच्या कुटुंबाचा कणा कसा बनला, हे समजून घेतलं.