खेडमध्ये मुरूम माफियांची मुजोरी

खेडमध्ये मुरूम माफियांची मुजोरी
Published on: 

दावडी, ता. २३ : अवैध गौण खनिज उत्खननावर कारवाईसाठी गेलेल्या महसूल पथकाचाच थरारक पाठलाग करण्यात आला. हायवाचा पाठलाग करत असताना दुचाकी आडवी घालून आणि वाहनासमोरच मुरूम टाकून पथकाचा रस्ता अडवण्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी (ता. २२) सायंकाळी घडला. या मुजोरीमुळे प्रशासनालाच थेट आव्हान दिल्याची चर्चा आहे.
याप्रकरणी मंडल अधिकारी शीला शेवाळे यांनी खेड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी गणेश साहेबराव हजारे (रा. कनेरसर), सुयोग पांडुरंग पानसरे (रा. पाबळ, ता. शिरूर) यांच्यासह दुचाकीवरील दोन अनोळखी व्यक्ती, हायवाचालक आणि दोन जेसीबीचालकांवर भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार एकूण सात जणांवर गुन्हा नोंदविला आहे.
अवैध उत्खननावरील कारवाईसाठी राजगुरुनगर येथून पाबळ रस्त्याने गुरुवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास तहसीलदार प्रशांत बेडसे, निवासी नायब तहसीलदार चेतन मोरे यांच्या नेतृत्वाखालील पथक जात होते. सायंकाळी सातच्या सुमारास निमगाव हद्दीत खेड सिटी परिसरात मुरूम वाहतूक करणारी हायवा गाडी पथकाच्या निदर्शनास आली. पथकाने या वाहनाचा पाठलाग सुरू केला असता रेटवडी येथील कॅनॉल रस्त्यावर चालकाने वाहनातील मुरूम रस्त्यावर टाकून पथकाचा मार्ग अडवला आणि हायवासह पलायन केले.
यानंतर पथक कनेरसर येथील उत्खननाच्या मुख्य ठिकाणी पोहोचले. पथकाची वाहने दिसताच जेसीबी चालकांनी यंत्रे सुमारे २०० मीटर अंतरावर नेऊन उभी केली आणि तेथून पळ काढला. या ठिकाणी उपस्थित असलेल्या गणेश हजारे याच्याकडे चौकशी केली असता, संबंधित जेसीबी स्वतःचे असल्याचे आणि हायवा गाडी सुयोग पानसरे याची असल्याची कबुली त्याने दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलिस निरीक्षक सुभाष चव्हाण करीत आहेत.

शासकीय जमिनीवरच डल्ला
महसूल पथक सायंकाळी साडेसातच्या सुमारास कनेरसर येथील हजारेवस्ती परिसरातील एमआयडीसीसाठी संपादित करण्यात आलेल्या गट क्रमांक १४८६ मध्ये पोहोचले. तेथे दोन जेसीबींच्या साहाय्याने उत्खनन सुरू होते. या ठिकाणी अंदाजे २७०० ब्रास मुरूम उत्खनन करून त्याची चोरी केल्याचे उघडकीस आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com