धामणीत खंडोबा बाणाईचा शाही विवाह सोहळा

धामणीत खंडोबा बाणाईचा शाही विवाह सोहळा
Published on

पारगाव, ता. २८ : धामणी (ता. आंबेगाव) येथील खंडोबा मंदिराच्या प्रांगणात पारंपारिक वाद्याच्या गजरात व शेकडो भाविकांच्या उपस्थितीत शाही थाटात आज शुक्रवारी श्रावण पौर्णिमेनिमित्त ‘सदानंदाचा येळकोट’च्या जयघोषात भंडारा खोबरे उधळून खंडोबा बाणाईचा विवाह सोहळा उत्साहात संपन्न झाला.
आज पहाटे श्रावण पौर्णिमेला (राखी पौर्णिमा) खंडोबा मंदिरात स्वयंभू सप्तशिवलिंगाचा अकरा जोडप्यांच्या हस्ते रुद्राभिषेक व दुग्धाभिषेक करण्यात आला. नंतर भाविकांच्या उपस्थितीत आरती झाली. त्यानंतर सेवेकरी दादाभाऊ भगत, प्रभाकर भगत, सुभाष तांबे, शांताराम भगत, राजेश भगत, नामदेव भगत, अनिरुद्ध वाळुंज व महिला भाविकांनी स्वयंभू सप्तशिवलिंगाला व सर्वांगसुंदर खंडोबा व बाणाईच्या पंचधातूच्या मुखवट्यांना चंदनऊटीचा लेप लावला. त्यावर सुंगधी दवण्याच्या अत्तरात मिश्रित केलेली हळद लावण्यात आली.
श्री खंडोबा व बाणाई यांच्या लग्न सोहळ्यानिमित्त मंदिराच्या गाभाऱ्यात आकर्षक फुलांची सजावट केली होती. खंडोबाला व बाणाईच्या मूर्तींना बाशिंग व मुंडावळ्या बांधण्यात आल्या. त्यानंतर आकर्षक वस्रालंकाराने सजवलेल्या बाशिंग व मुंडावळ्या बांधलेल्या खंडोबा व बाणाईच्या मुखवट्याची मिरवणूक सकाळी सहा वाजता मंदिरात विसावली. मंदिराच्या आवारात नवरदेव खंडोबाच्या मुखवट्याचे महिलांनी औक्षण करून स्वागत केले. त्यानंतर सनई, तुतारी व ढोलाच्या निनादात बाशिंगच्या मुंडावळ्या घातलेल्या व हिरवी साडी परिधान केलेल्या व वस्रालंकार घातलेला बाणाईचा मुखवटा मंदिरातून सेवेकरी मंडळींनी लग्नमंडपात वाजतगाजत आणला. त्यानंतर मंगलाष्टकाला सुरुवात करण्यात येऊन खंडोबा व बाणाईच्या मुखवट्यावर फुलांच्या पाकळ्यांची व अक्षता, भंडार्‍याची उधळण करून वाद्याच्या गजरात व आतषबाजीत सदानंदाचा येळकोटच्या जयघोषात खंडोबा व बाणाईचा विवाह सोहळा पार पडला. त्यानंतर उपस्थित वऱ्हाडी मंडळींना प्रसाद वाटण्यात आला. या शाही विवाह सोहळ्याचे पौरोहित्य प्रमोद देखणे्. पोपट भोजने. गणपत भोजने.गणेश जारकर.भाऊ भोजने.यांनी केले. यावेळी सेवेकरी.मानकरी मंडळी व पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते महिला भाविकांची उपस्थिती लक्षणीय होती.
फोटो ओळी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com