सुखाची हरवलेली संध्याकाळ

सुखाची हरवलेली संध्याकाळ
Published on: 

सुखाची हरवलेली संध्याकाळ

साधारण ८० च्या दशकातील खेडोपाड्यातील वातावरण आजही डोळ्यासमोर उभे राहते. दिवस मावळतीला आला की घराघरांत एक वेगळीच लगबग सुरू व्हायची. दिवसभर शेतात कष्ट करून आलेली वडीलधारी माणसे घरी आली, की अंगणात एखादे पोते टाकायची. जुन्या कपड्यांचे बांधलेले गाठोडे उशी म्हणून डोक्याखाली घ्यायचे आणि चांदण्यांनी भरलेल्या अंगणात क्षणभर निवांत पडायचे.
त्यांच्या अंगाखांद्यावर मुले खेळायची. कधी वडील मुलांना जवळ घेऊन गोष्ट सांगायचे. त्या गोष्टी ऐकताना मुलांच्या आनंदाला पारावर उरायचा नाही.
दिवसभर शेतात चरून आलेली शेळी, म्हैस अंगणात रवंथ करत बसायची. कोंबड्यांसाठी खुराडे ठेवलेले असायचे. जसजसा अंधार होत जाईल तसतसे एक एक कोंबडी खुराड्यात बसायची. एखादी कोंबडी दमवायची. मग तिला धरून खुराड्यात डालायची. मग आई म्हशीची धार काढायची. नुकतेच काढलेले धारोष्ण, निरसे दूध मुलांना प्याला भरून दिले जायचे. दूध पिऊन झाल्यावर मुलांच्या ओठांवर दुधाच्या मिशा उमटायच्या. त्या मिशा पाहून मुले स्वतःच हसायची आणि आपण आता ताकदवान झालो आहोत, असे समजायची. त्या आनंदाची सर कशालाच नव्हती! त्या दुधाने दिलेली ताकद म्हातारे होईपर्यंत पुरायची.
मग चूल पेटायची. चुलीवर स्वयंपाक सुरू व्हायचा. धुराचा दरवळ, जळणाऱ्या लाकडांचा मंद आवाज, आईची स्वयंपाकाची लगबग, भाकरी थापतानाचा आवाज आणि बाहेर वडिलांबरोबर खेळणाऱ्या मुलांचा गलका... या सगळ्यांनी संध्याकाळ जिवंत व्हायची.
स्वयंपाक कधी झोपडीत व्हायचा, तर कधी अंगणातच चूल पेटवली जायची. चुलीतील त्या आरावर भाजलेल्या बाजरीच्या भाकरीची चवच न्यारी! थंडी असली किंवा पावसात भिजून आलो तर चुलीतील आरावर शेकले जायचे. त्या आराची ऊब सर्दी-पडसे सगळे काही पळवून लावायची. चुलीतील धूर डोळ्यात जायचा; पण त्या धुरातून आईच्या वेदना जाणवायच्या.
आईचा स्वयंपाक आणि वडिलांचे मुलांना खेळवणे... या दोन्हींच्या संगमाने संध्याकाळ रंगतदार व्हायची.
वडिलांबरोबरचा तो खेळ म्हणजे केवळ खेळ नव्हता; तो मुलांच्या मनात वडिलांविषयी प्रेम, आपुलकी आणि सुरक्षिततेची भावना रुजवणारा संस्कार होता. कधी ‘कुकूच्या कू’ चालायचे, तर कधी ‘चल रे भोपळ्या टुणूक टुणूक...!’ संध्याकाळी प्रत्येकाच्या अंगणात जणू आनंदाचा उत्सवच भरायचा.
अनेकदा शेजारचे एखादे आजोबा गप्पा मारायला येऊन बसायचे. त्या गप्पा शेतीच्या असायच्या, पाऊस-पाण्याच्या असायच्या, पीकपाण्याच्या असायच्या. कोणाबद्दल द्वेष नसायचा, असूया नसायची आणि राजकारणही नसायचं. मनातलं बोलून मन मोकळं व्हायचं. तासन्‌तास गप्पा रंगायच्या. जेवणाची वेळ झाली की गप्पांना विराम मिळायचा आणि मग आजोबा निरोप घ्यायचे. वयस्कर माणसांच्या त्या गप्पा लहान मुले कुतूहलाने ऐकायची. रोज अशी म्हातारी माणसे दारात येऊन बसावीत, असे त्यांना वाटायचे. त्यांच्या अनुभवांतून लहानग्यांना आयुष्याची शिदोरी मिळायची. पूर्वीची ती संध्याकाळ साधी होती; पण सुखाने भरलेली होती.
आज मात्र ग्रामीण भागातील हे चित्र मोठ्या प्रमाणात बदलले आहे. शहरी भागातील तर विचारूच नका! पूर्वीची ती सुखाची संध्याकाळ आता जणू मावळून गेली आहे. नोकरदार असो वा शेतकरी, कामावरून किंवा शेतातून घरी आल्यानंतर हातात येणारी पहिली गोष्ट म्हणजे मोबाईल. दिवसभराच्या थकव्यावर आराम म्हणून मोबाईल हातात घेतला जातो आणि कधी तास-दोन तास निघून जातात, हे कळतही नाही. मुलं काही बोलायला आली तर त्यांच्याशी तेवढ्यापुरते दोन शब्द बोलले जातात... आणि पुन्हा लक्ष मोबाईलकडे.
मुलं वडिलांबरोबर खेळण्याऐवजी आता स्वतःच घरात एकटी खेळत आहेत. वडील मोबाईलमध्ये गुंतले आहेत. आईच्या मोबाईलवर यूट्यूबवर ‘चल रे भोपळ्या टुणूक टुणूक’ लावून मुलाला सांगितले जाते.
“बसा, बघत!”
पूर्वी वडील गोष्ट सांगायचे; आता मोबाईल गोष्ट सांगतो.
पूर्वी मुलांना वडिलांच्या अंगाखांद्यावर खेळायला मिळायचे; आता अनेक मुलांना स्वतःशीच खेळावे लागते. यूट्यूब पाहत पाहत चार घास जबरदस्तीने खायचे आणि झोपायचे, ही अनेक मुलांची दिनचर्या बनली आहे.
पूर्वी कंदिलाच्या उजेडात गोष्ट ऐकत, अंगणात खेळत, शेळ्या-मेंढ्या-कोंबड्या आणि म्हशींच्या सहवासात, आजी-आजोबांच्या गप्पा ऐकत संध्याकाळ सरायची.
आता स्क्रीनसमोर बसून संध्याकाळ सरते... आणि रात्रही.
पूर्वी संध्याकाळ माणसांना एकत्र आणायची. विचारांची देवाणघेवाण व्हायची. सुख-दुःखाची चर्चा व्हायची. नाती घट्ट व्हायची. आता मोबाईल माणसांना वेगवेगळ्या स्क्रीनमध्ये विभागतो आहे.
आई तिच्या मोबाईलमध्ये...
वडील त्यांच्या मोबाईलमध्ये...
आणि मुलं त्यांच्या स्क्रीनमध्ये!
मग मुलांनी कोणाशी खेळायचे?
पूर्वी घरात गोष्ट सांगणारे वडील होते; आज घरात गोष्ट सांगणारा मोबाईल आहे.
पूर्वी अंगणात हशा होता; आज हातात स्क्रीन आहे.
पूर्वी संध्याकाळ कुटुंबाची असायची; आज ती इंटरनेटची झाली आहे.
म्हणून मनात एकच प्रश्न पुन्हा पुन्हा येतो—
आपली ती सुखाची संध्याकाळ नेमकी कुठे हरवली?
आणि हा बदल खरंच केवळ काळामुळे झाला आहे, की आपल्या हातात आलेल्या मोबाईलमुळे?
मोबाईलला वेळ देताना आपण आपल्या माणसांसाठीचा वेळ हरवून तर बसलो नाही ना?
मोबाईल आपल्याला जगाशी जोडतो आहे; पण त्याच वेळी आपल्या घरातील माणसांपासून दूर तर नेत नाही ना?
एकदा... संध्याकाळी मोबाईल बाजूला ठेवून अंगणात बसून पाहूया. मुलांना जवळ घेऊया. एखादी गोष्ट सांगूया. आई-बाबांशी दोन शब्द बोलूया. आजोबा-आजींच्या आठवणी ऐकूया. कदाचित... कदाचित आपली हरवलेली सुखाची संध्याकाळ अजूनही तिथेच असेल...आपली वाट पाहत!


-अमोल कोळेकर, सातारा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com