दुनियादारी : रसमलाई

‘अरे कायऽऽऽऽऽ? काय चाललंय तुझं?’ सुरभी दबक्या आवाजात ऑलमोस्ट ओरडली.
Rasmalai
RasmalaiSakal
Updated on
Summary

‘अरे कायऽऽऽऽऽ? काय चाललंय तुझं?’ सुरभी दबक्या आवाजात ऑलमोस्ट ओरडली.

‘अरे कायऽऽऽऽऽ? काय चाललंय तुझं?’ सुरभी दबक्या आवाजात ऑलमोस्ट ओरडली.

‘काही नाही होत गं! चालतं तेवढं!’ ऋषभ म्हणाला.

‘कितवी वाटी ही तुझी?’

‘सहावी का सातवी असेल,’ ऋषभ एक हातानं रसमलाईच्या वाटीतला चमचा उचलत दुसऱ्या हातानं हसरं तोंड लपवायची ॲक्टिंग करायला लागला, कारण समोरून सुरभी त्याला, ‘कसला पथेटीक आहेस,’ असा लुक देत होती.

‘अरे कोविडमधलं लग्न आहे हे, लिमिटेड लोकं आणि लिमिटेड मेनू आहे. काही लाज वाटते का तुला? सर्वांत पहिले येऊन बसलास आणि खातोच आहेस. इतरांसाठी ठेव शिल्लक!’ ती त्या ऐन उन्हाळ्यातल्या त्यांच्या मित्राच्या लग्नात दोघं एका कोपऱ्यातल्या टेबलावर बसलेले असताना म्हणाली.

‘प्लीजच! कोविड संपून महिने झाले आता! ह्यानं ना चींगुगिरी करत निपटवलं आहे लग्न. सगळं अलाउड आहे आता माणसं वगैरे, तरी ह्यानं १०० च बोलावली,’ ऋषभ खाता खाता सहज म्हणाला.

‘आणि आपल्याच मित्राचं लग्न आहे ना? मग आपण त्याच्या आनंदात सामील होतोय आनंदानं! फक्त माझी आनंद व्यक्त करायची पद्धत वेगळी आहे बास!’ तो एक मोठी स्माईल देत, नाजूक टिकलीच्या दोन्ही बाजूला भुवया उंचावून त्याच्या पाणचट बोलण्याकडं बघणाऱ्या सुरभीला म्हणाला.

‘असं काय बघती आहेस तू माझ्याकडं? ते त्याचे काका आणि मग आई येऊन म्हणून गेले ना... सावकाश जेवा, भरपूर जेवा!’

‘ते तसं म्हणण्याची पद्धत आहे. खरंच तसं केलं पाहिजे असं कंपल्शन नाहीये.’

‘अगं पण त्यांना आणि मित्र म्हणून आपल्या मित्रालाही, आपण भरपूर छान जेवलो, ते ही आनंदाने, ह्याचा आनंदच होणारे...’

‘सगळी बोलबच्चन करणं तयार ना तुझ्याकडं?’

‘एकदम सही पकडे हैं आप तो!’

‘निर्लज्ज कुठला.’

‘इतक्या उत्तम लग्नाच्या जेवणात थोडं निर्लज्जच असायला हवं! आणि आता तीच संधी मी तुलाही देत आहे...!’ तो असं म्हणत अजून मिश्किल स्माईल द्यायला लागला.

‘हां? मला? मला नको कसलीही संधी. झालं माझं, मी फूल आहे!’ सुरभी पटकन म्हणाली.

‘अगं तुझ्यासाठी नाही वेडे... माझ्यासाठी जरा निर्लज्ज हो आणि आणखी एक वाटी मला रसमलाई आण ना! तो रसमलाई वाढणारा केटरर माझा चेहरा ओळखायला लागलंय. सो तू आण ना जरा माझ्यासाठी. प्लीज ssss!’ ऋषभ निरागस चेहऱ्यानं म्हणाला.

‘अरे कसला...’

‘प्लीजऽऽऽऽऽऽ....’

‘मी नाही....’

‘प्लीज ऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽ...’

‘आणणार ना...’

‘आण ना, आण ना... प्लीज ऽऽऽऽऽ’

सुरभीला ऋषभ वाक्य पूर्णच करू देत नाही. ती त्याला लुक देऊन खुर्चीतून उठते. उन्हाळ्यातल्या लग्नात आणि भरजरी कपड्यांमध्ये दोन ओघळ घाम तिच्या कानापाशी हळूवार सरकत असतो. एका मिनिटात ती वाटीभरून रसमलाई घेऊन येते आणि त्याच्यासमोर ठेवते.

‘गिळ!’ असं म्हणत ती पुन्हा समोर बसते.

‘कित्ती गोड!’ ऋषभ चमचा बुडवत म्हणतो.

‘मी नाहीये काही गोड वगैरे!’ सुरभी त्याला परत लुक देत म्हणते.

‘अगं मी रसमलाईबद्दल म्हणत होतो...’ ऋषभ हसणं ओठात दाबत म्हणतो आणि मग फुटतो.

ती त्याला तसाच लुक देत राहते आणि अजून एक घामाचा ओघळ तिच्या केसांपाशी त्याला दिसतो. तो रसमलाईची वाटी तिथेच ठेऊन एक लांब ठेवलेला मोठा पाणी शिंपडणारा पंखा जवळ खेचून घेतो आणि सुरभीच्या दिशेने फिरवतो. हवा लागताच सुरभीचे केस अलगद उडायला लागतात आणि चेहऱ्यावर तिनं खुलून दाखवलं नाही, तरी तिला मनोमनी छान वाटायला लागतं. ती त्याच्याकडं एकदा छान बघते. ऋषभ पुन्हा येऊन त्याचा जाग्यावर बसतच असतो तेव्हा सुरभी हळूच पुटपुटते,

‘कित्ती गोड...’

ऋषभ खाता खाता मान वर करून तिच्याकडं बघतो.

‘...रसमलाईबद्दल बोलतीये मी!’ ती मुद्दाम पटकन बोलते आणि एका गालात हसते.

ऋषभसुद्धा तिच्याकडं बघून एका गालात हसतो.

लिमिटेड मेनूमधला अनलिमिटेड आनंद!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com