कऱ्हाडला कोरोना सर्व्हे यंत्रणेत समन्वयाचा अभाव

Satara
Satara

कऱ्हाड (जि. सातारा) : कोरोनाचा वाढता कहर अत्यंत दाहक बनतो आहे. ऑक्‍सिजन बेड नसल्यामुळे अनेकांना जीव गमावावा लागतो आहे. अशा काळात पालिका, आरोग्य विभागाच्या यंत्रणेत समन्वयाचा अभाव दिसत आहे. 

कोरोनाचा शहरात वाढता कहर लक्षात घेऊन पालिका विविध उपाययोजना राबवीत आहे. शहरात पालिकेतर्फे मध्यंतरी घरोघरी सर्व्हे सुरू केला होता. मात्र, गणेशोत्सवाच्या काळात त्या सर्व्हेत खंड पडला आहे. परिणामी शहरातील आजारी, वयस्कर नागरिकांची माहिती पालिकेकडे अद्ययावत झाली नाही. त्याचाच परिणाम अनेकांवर होऊ लागला आहे. येथील सोमवार पेठेत परवा एका कोरोनाग्रस्ताचा मृत्यू झाला. त्याची माहिती पालिकेला देण्यात आली होती. वास्तविक ती संबंधित व्यक्ती पूर्वीपासून आजारी होती. त्यांच्यावर कृष्णा रुग्णालयात उपचारही सुरू होते. त्यांच्या नातेवाईकांनी पालिकेच्या सर्व्हेतही त्याची माहिती दिली होती. मात्र, पालिकेकडून पुढच्या काहीच हालचाली झाल्या नाहीत.

दरम्यानच्या काळात ती संबंधित व्यक्ती घरीच होती. त्यावेळी त्यांचा स्वॅब घेण्यात आला होता. मात्र, त्यांचा अहवाल येण्यापूर्वी त्याच दिवशी सायंकाळी त्यांचा मृत्यू झाला. नातेवाईकांनी त्याचवेळी त्याची माहिती पालिकेला दिली. मात्र, पालिकेत समन्वयाअभावी त्याकडे दुर्लक्ष झाले. पालिकाही मोजक्‍याच व्यक्तीवर काम करत असल्याने हतबल झाली. तरी त्यांनी याकडे गांभीर्याने पाहणे गरजेचे होते. सायंकाळी कोणीही उपलब्ध न झाल्याने दुसऱ्या दिवशी मुख्याधिकारी रमाकांत डाके व त्यांचे सहकाऱ्यांनी संबंधित व्यक्तीचा मृतदेह घरातून बाहेर काढून सर्व सोपस्कार पार पाडले. मात्र, त्या दरम्यानच्या काळात समन्वयाअभावी तब्बल रात्रभर संबंधित मृत व्यक्तीचा मृतदेह घरात होता. असे प्रसंग टाळण्यासाठी पालिकेने योग्य समन्वय साधण्याची गरज आहे.

समाजसेवी भावनेतून काम करणारे अनेकजण शहरात तयार आहेत. त्यांना मदतीला घेऊन पालिकेने कोरोना काळात योग्य त्या उपाययोजना राबविण्यासाठी हालचाली केल्यास असे प्रसंग टाळता येणे शक्‍य आहे. त्यामुळे पालिकेने शहरातील गणेश मंडळे, सेवाभावी संस्था, विविध संघटना यांची बैठक घेऊन त्याबाबत ठोस निर्णय घेण्याची गरज आहे. 

सल्ल्यासाठी मेडिकल हेल्पलाइन करावी 

पालिकेने सर्व्हे अद्ययावत करावा. त्यात जे काही कोमऑरबीटसह होम आयसोलेशन झाले आहेत, त्यांच्यासाठी पालिकेने टेली फोनिक मेडिकल हेल्पलाइन सुरू करावी. बाधितांसह आजारी लोकांना सल्ले देण्यासाठी तज्ज्ञ डॉक्‍टर त्या फोनवर उपलब्ध करून द्यावेत. ते तज्ज्ञ डॉक्‍टर त्या व्यक्तींना फोनवरूच सर्व माहिती विचारून त्यांना आहार व औषधाबाबत सल्ले देतील, अशी सोय करावी. 

संपादन : पांडुरंग बर्गे  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com