भोंदू खरातच्या ‘ईडी’ कोठडीत वाढ
बेहिशेबी मालमत्ता प्रकरण : आवारे, कांडेकरला सशर्त जामीन
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. ७ : दैवी शक्ती, जादूटोण्याचा धाक दाखवून महिलांचे लैंगिक शोषण करणाऱ्या व बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी संशयित भोंदू अशोक खरात याच्याविरोधातील सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) खटल्यात न्यायालयीन कोठडीत वाढ करण्यात आली आहे. मुंबईच्या ‘ईडी’ न्यायालयात हा खटला सुरू असून, याच प्रकरणात संशयित नामकरण आवारे, अविनाश कांडेकर यांना ‘ईडी’ न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर करताना, त्यांना विनापरवानगी परदेशात जाण्यास सक्त मनाई केली आहे.
खरात याच्या विरोधात अत्याचारासह फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणी सध्या तो नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहे. खरातविरुद्ध मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायदा (पीएमएलए) २००२ अंतर्गत ६ एप्रिलला ‘ईडी’ने ४२ कोटी ८८ लाख रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी स्वतंत्र गुन्हा दाखल केला असून, मुंबईच्या विशेष ईडी न्यायालयात सुमारे तीन हजार पानांचे दोषारोपपत्र दाखल करण्यात आलेले आहे. या प्रकरणात खरात याच्यासह अरविंद पांडुरंग बावके, नामकरण आवारे, अनिवाश कांडेकर, मिलिंद बनकर आणि खरातची पत्नी कल्पना खरात यांचाही समावेश आहे.
ईडी न्यायालयाने यापूर्वीच या प्रकरणात खरातची पत्नी कल्पना हिला सशर्त जामीन मंजूर केलेला आहे. त्यानंतर आवारे, कांडेकर यांनीही ईडी न्यायालयाकडे जामिनासाठी अर्ज केला असता, या दोघांना एक लाखाच्या जातमुचलक्यावर अन् त्याच रकमेच्या दोन जामीनदारांसह जामीन मंजूर केला आहे. तसेच, ईडीच्या चौकशीला उपस्थित राहण्यासह खटल्याशी संबंधित पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न, साक्षीदारांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यास जामीन रद्द करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे, दोघांनाही न्यायालयाच्या परवानगीशिवाय परदेशात जाण्यास मनाई केली आहे. या सशर्त जामिनाचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. या वेळी ईडी न्यायालयासमोर खरातला नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहातून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित करण्यात आले होते. खरातविरोधात नाशिकमधील सरकारवाडा पोलिस ठाण्यासह नाशिक ग्रामीणमधील वावी, सिन्नर, तर अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डी, राहाता पोलिस ठाण्यांमध्ये एकूण १८ गुन्हे दाखल आहेत.
जामिनासह दोषनिश्चिती आज
दरम्यान, खरात याच्याविरोधात नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयात दोषनिश्चितीबाबत गुरुवारी (ता. ८) तारीख आहे. अत्याचाराच्या गुन्ह्यांसंदर्भात खरातने दाखल केलेल्या जामीन अर्जावरील सुनावणीदेखील गुरुवारीच आहे. सरकार पक्षाने खरातच्या जामिनाला विरोध केला आहे.