संक्षिप्त
‘भाज्यांची शाळा’तून
आनंददायी शिक्षण
जळगाव : मेहरुण येथील संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात ‘आनंददायी शनिवार’ उपक्रमांतर्गत इयत्ता दुसरीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘भाज्यांची शाळा’ हा उपक्रम घेण्यात आला. मराठी पाठ्यपुस्तकातील ‘भाज्यांची शाळा’ या कवितेच्या आधारे राबविण्यात आलेल्या उपक्रमात विद्यार्थ्यांनी विविध भाज्या प्रत्यक्ष पाहून त्यांची नावे, रंग, आकार, चव, उपयोग व पौष्टिक महत्त्व जाणून घेतले. विद्यार्थ्यांनी भाज्यांची ओळख करून देत त्यांची माहितीही सांगितली. ‘भाज्या ओळखा, आरोग्य जपा’ या संदेशातून सकस आहाराचे महत्त्व पटवून देण्यात आले. उपशिक्षिका नैना माईंदे यांनी मार्गदर्शन केले. मुख्याध्यापक मुकेश नाईक व पर्यवेक्षक नीलेश पवार यांचे मार्गदर्शन लाभले.
..........
शंभर कडुलिंबाच्या
रोपांचे वृक्षारोपण
जळगाव : शहरातील सै. नियाज अली भैया फाउंडेशनतर्फे वृक्षारोपण मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत १०० कडुलिंबाच्या रोपांची लागवड करून त्यांच्या संवर्धनाची जबाबदारी घेण्यात आली. जळगाव शहर वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक मोरेश्वर पेंदाम यांच्या हस्ते वृक्षारोपण करून मोहिमेची सुरुवात करण्यात आली. यावेळी फाउंडेशनचे सै. अयाज अली, असलम बाबा अशरफी, शेख अबुल जुम्मन, शेख शफी, ॲड. इमरान साहिल, इकबाल वझीर, रऊफ खान यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी नागरिकांनी वृक्षलागवडीसोबतच वृक्षसंवर्धनाची जबाबदारी घ्यावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले.