फोटो : H34977
पहाट पाडव्याला भक्तिस्वराचा साज
भजन, अभंग, देशभक्तिपर गीतांनी रसिक मुग्ध
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. १४ : मखमलाबाद येथे दीपावली स्नेहमिलन व पहाट पाडवा संगीत सोहळा भक्तिमय वातावरणात पार पडला. पहाटेच्या प्रसन्न वातावरणात भजन, अभंग, हिंदी-मराठी आणि देशभक्तिपर गीतांच्या सुरेल सादरीकरणाने उपस्थित रसिकांना मुग्ध केले. आर्ट ऑफ लिव्हिंग परिवार, मखमलाबाद आणि जिजाई युवा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. उपक्रमाचे यंदा चौदावे वर्ष होते.
ब्रह्मचारी पुण्यश्लोक स्वामी, सचिन विधाते, यशोदीप जोशी, मधुरा दाणी, अनन्या दाणी, युवराज शिंदे यांनी सादर केलेल्या नमो नमोजी शंकरा, केशवा माधवा, जगन्नाथ, सोन्याचा पिंजरा यांसारख्या भक्तिगीतांनी मैफलीत रंग भरला. त्यानंतर ये वतन मेरे आबाद रहे तू आणि तेरी मिट्टी या देशभक्तिपर गीतांनी वातावरण भारावून गेले. कौस्तुभ भारोटे, तेजस विसपुते, चिन्मय कुलकर्णी, ईश्वर आंधळे यांनी साथसंगत केली. याप्रसंगी आमदार गोकुळ गिते, नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गणेश गिते, महापौर हिमगौरी आडके, माजी आमदार बाळासाहेब सानप, नगरसेवक प्रमोद पालवे, हेमंत धात्रक, पोलीस उपायुक्त प्रकाश गायकवाड, आर्ट ऑफ लिव्हिंगचे निवृत्ती काकड, विजय हाके प्रशिक्षक, स्वयंसेवक उपस्थित होते. प्रा. गणेश मोगल यांनी सूत्रसंचालन केले.
-------