न्याहळोद येथे बीएसएनएल सेवा विस्कळीत
वीज गेली की तासन्तास मोबाईल नेटवर्क ठप्प
सकाळ वृत्तसेवा
न्याहळोद, ता. ७ : धुळे तालुक्यातील न्याहळोद येथे बीएसएनएलची मोबाईल व इंटरनेट सेवा वारंवार विस्कळीत होत असल्याने ग्राहकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. विशेषतः वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर तासन्तास इंटरनेट आणि कॉलिंग सेवा बंद राहत असल्याने नागरिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे.
गावातील अनेक नागरिक बीएसएनएलचे मोबाईल कनेक्शन वापरतात. मात्र, वीज गेल्यानंतर नेटवर्क सेवा बंद पडत असल्याने फोन कॉल करणे, फोन येणे तसेच इंटरनेटचा वापर करणे अशक्य होते. त्यामुळे अत्यावश्यक कामांसाठीही नागरिकांना इतर पर्यायी नेटवर्कचा आधार घ्यावा लागत आहे. सध्या मोबाईल रिचार्जचे दर वाढलेले असताना ग्राहकांकडून महागडे रिचार्ज करूनही प्रत्यक्षात सेवा उपलब्ध होत नसल्याने पैसे वाया जात असल्याची भावना ग्राहकांमध्ये आहे. महिन्याभरासाठी रिचार्ज केल्यानंतर नेटवर्कअभावी अनेक तास सेवा वापरता येत नसल्याने ग्राहकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
ऑनलाइन व्यवहारांवरही परिणाम
मोबाईल इंटरनेट आणि कॉलिंग सेवा बंद असल्याने ऑनलाइन व्यवहार, यूपीआय पेमेंट, बँकिंग, शासकीय कामे, विद्यार्थ्यांचे ऑनलाइन शिक्षण तसेच व्यावसायिक कामांवर परिणाम होत आहे. विशेषतः वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर अनेक तास नेटवर्क उपलब्ध नसणे ही समस्या नागरिकांसाठी गंभीर ठरत आहे. बीएसएनएल प्रशासनाने संबंधित मोबाईल टॉवर व नेटवर्क यंत्रणेची तातडीने तपासणी करून वीज गेल्यानंतरही सेवा सुरू राहण्यासाठी बॅकअप वीजव्यवस्था सक्षम करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.