NSK26H31458
जळगाव : ‘करिअर’बाबत मार्गदर्शन करताना आनंद मापुस्कर.
––––
मेहनतीची तयारी ठेवल्यास करिअरच्या प्रचंड संधी
(उपशीर्षक)
आनंद मापुस्कर : ‘करिअर निवडताना’ विषयावर व्याख्यान
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. ५ : करिअर म्हणजे केवळ परीक्षेत मिळणारे गुण नव्हेत. आजच्या वेगाने बदलणाऱ्या काळात स्वतःतील अभिक्षमता आणि नैसर्गिक कल ओळखून मार्ग निवडल्यास प्रत्येक क्षेत्रात यशाच्या प्रचंड संधी उपलब्ध आहेत, असे प्रतिपादन करिअर समुपदेशक व उच्च शिक्षण संशोधक आनंद मापुस्कर यांनी केले.
रिफ्लेक्शन फाउंडेशनच्या ''पालक शाळा'' उपक्रमांतर्गत रविवारी (ता.४) ला. ना. शाळेच्या गंधे सभागृहात ''करिअर निवडताना'' या विषयावर मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात मापुस्कर यांनी विद्यार्थी व पालकांशी संवाद साधताना करिअर निवडीचे विविध पैलू उलगडून दाखवले. यावेळी फाउंडेशनचे अध्यक्ष रत्नाकर पाटील उपस्थित होते.
मापुस्कर म्हणाले, की बुद्धिमत्ता केवळ एकाच प्रकारची नसते, तर तिचे तब्बल १२० प्रकार आहेत. त्यामुळे मुलांची बुद्धिमत्ता आणि नैसर्गिक कल अचूक ओळखणे गरजेचे आहे. करिअरची निवड करताना गुण, आवड, शिक्षण आणि आपले व्यक्तिमत्त्व या चार घटकांचा समतोल साधला गेला पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.