आदिवासी विद्यार्थ्यांची माफी मागा
कॉग्रेस आक्रमक : जिल्हा प्रशासनाला निवेदन
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. ९ : मुंबईत आंदोलन करणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांवरील पोलिसांच्या कारवाईविरोधात काँग्रेस आक्रमक झाली आहे. सरकारने विद्यार्थ्यांची माफी मागून त्यांच्या मागण्या तातडीने सोडवाव्यात, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा काँग्रेसने दिला. यासंदर्भात शुक्रवारी (ता. ९) निवासी उपजिल्हाधिकारी रोहितकुमार राजपूत यांना निवेदन देण्यात आले.
आदिवासी विद्यार्थी विविध मागण्यांसाठी सुमारे १८० किलोमीटर पायी चालत मुंबईत पोहोचले होते. दादर येथील काँग्रेस कार्यालयात थांबलेल्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर वाहनातून मुंबईत फिरवून त्यांची दिशाभूल केल्याचा आरोप काँग्रेसने केला.
आश्रमशाळांमधील सोयीसुविधा, शिष्यवृत्ती, गडचिरोलीतील जपतलाई आश्रमशाळेत सर्पदंशाने मृत्यू झालेल्या तीन विद्यार्थ्यांच्या पालकांना भरपाई आणि आदिवासी विकास विभागातील भ्रष्टाचाराची चौकशी या मागण्यांसाठी विद्यार्थी मुंबईत आले होते. विद्यार्थ्यांवरील कारवाईप्रकरणी संबंधित पोलिस अधिकाऱ्यांची चौकशी करून कारवाई करावी, तसेच मुख्यमंत्र्यांनी बैठक घेऊन त्यांच्या मागण्यांवर सकारात्मक तोडगा काढावा, अशी मागणी काँग्रेसने केली.
या वेळी शहराध्यक्ष नीलेश खैरे, रमेश जाधव, पोपटराव धात्रक, ज्ञानेश्वर काळे, जयेश पोकळे, समाधान बागूल यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
फोटो क्रमांक :- एच-31827