(टुडे पान एक ॲन्कर)
-----
फोटो : NSK26H33413
नंदुरबार : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत शेतकऱ्यांचे प्रश्न मांडतांना डॉ. अभिजित मोरे.
------------
शेतकऱ्यांना पीक विमा मंजूर करून दिवाळीपूर्वी भरपाई द्यावी
डॉ. अभिजित मोरे : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे मागणी
सकाळ वृत्तसेवा
नंदुरबार, ता. २४ : नंदुरबार तालुक्यासह रनाळे गावातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना खरीप हंगामाचा पीकविमा मंजूर करावा. तसेच, नुकसान भरपाईची रक्कम दिवाळीपूर्वी शेतककऱ्यांच्या खात्यात जमा करावी, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. अभिजित मोरे यांनी केली. डॉ. मोरे यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या शिष्टमंडळातर्फे शुक्रवारी (ता. २३) मुंबई येथील सह्याद्री अतिथिगृहात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन दिले.
नंदुरबार जिल्ह्यात कोरड्या दुष्काळामुळे निर्माण झालेली परिस्थिती, खरीप पिकांचे नुकसान आणि शेतकऱ्यासमोर असलेले आर्थिक संकटाची माहिती उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना शिष्टमंडळाने दिली. अस्मानी संकटामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी त्यांच्या हक्काचा पीकविमा तातडीने मंजूर करावा. नुकसानभरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी या वेळी करण्यात आली. शेतकऱ्यांच्या प्रश्नांची दखल घेत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी संबंधित विभागाला पीकविमा मंजुरीसाठी तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. याबाबत पाठपुरावा करण्यात येईल, असे आश्वासन शिष्टमंडळाला दिले.
दुष्काळामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी पीकविम्याची रक्कम मिळाल्यास त्यांना मोठा दिलासा मिळेल, अशी अपेक्षा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाने व्यक्त केली. या वेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा सरचिटणीस मधुकर पाटील, जिल्हा सरचिटणीस सुरेंद्र कुवर, नंदुरबार तालुकाध्यक्ष डॉ. योगेश पाटील, शहराध्यक्ष निंबा माळी, रनाळे ग्रामपंचायत सदस्य सुरेश भाबड, राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश संघटक बबलू कदमबांडे, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष रवींद्र कुंवर यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.