धुळे टुडे २ साठी...
---
मृत्यू दाखल्यासाठी फिरफिर थांबली
---
नगरसेवक माळींकडून घरपोच दाखल्याच्या व्यवस्था
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. ८ : घरातील जवळच्या व्यक्तीचे निधन होणे हा कौटुंबिक आणि भावनिकदृष्ट्या अत्यंत कठीण प्रसंग असतो. दुःखाच्या या प्रसंगात मृत्यू झालेल्या व्यक्तिचा मृत्यू दाखला कुटुंबियांना वेळेवर प्राप्त व्हावा यासाठी प्रभाग-१ चे नगरसेवक ललित माळी यांनी घरपोच मृत्यू दाखल पोचविण्याचा उपक्रम सुरु केला आहे. यात आत्तापर्यंत प्रभागातील १३२ कुटुंबांना त्यांच्या घरातील मृत व्यक्तीचा मृत्यू दाखला घरपोच दिला आहे.
कुटुंबातील सदस्याचे निधन झाल्यानंतर कुटुंबीयांना मृत्यू दाखला मिळविण्यासाठी महापालिकेचे हेलपाटे मारावे लागू नयेत, यासाठी प्रभाग क्रमांक १ मध्ये हा उपक्रम राबविला जात आहे. नगरसेवक माळी यांच्या पुढाकारातून जानेवारी- २०२६ पासून आत्तापर्यंत प्रभागातील १३२ कुटुंबांना त्यांच्या घरातील मृत सदस्याचा मृत्यू दाखला थेट घरपोच देण्यात आला आहे. नागरिकांच्या सुख- दुःखात सहभागी होत महापालिकेच्या सेवा दारापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रयत्न आहे. घरातील व्यक्ती गेल्यावर मृत्यू दाखला मिळवण्यासाठी मनपा कार्यालयात कागदपत्रांची पूर्तता करणे, विचारणा करणे आणि दाखला मिळवण्यासाठी वारंवार फेऱ्या मारणे यामुळे कुटुंबियांची मोठी प्रशासकीय धावपळ होते. ही धावपळ थांबवण्यासाठी आवश्यक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर महापालिकेचा मृत्यू दाखला थेट संबंधित कुटुंबाच्या दारात पोहोचवला जात आहे.
आत्तापर्यंत १३२ कुटुंबांना या सेवेचा लाभ मिळाला असून, येत्या काही दिवसांत आणखी ९० जणांचे मृत्यू दाखले त्यांच्या कुटुंबियांना घरपोच देण्यात येणार आहेत. नुकतेच श्रीकृष्ण मंदिराचे संत साळकर बाबा यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबीयांनाही घरपोच दाखला सुपूर्द करण्यात आल्याचे नगरसेवक श्री. माळी यांनी म्हटले आहे.
---