टुडे ॲंकर ४
NSK26H33349, NSK26H33350
जळगाव : बाजारात विक्रीसाठी दाखल झालेले आकर्षक गिफ्ट बॉक्स.
---
शीर्षक
दिवाळीसाठी ड्रायफ्रूटच्या आकर्षक पॅकिंगला पसंती
गिफ्ट बॉक्स, सजावटीच्या टोपल्या आणि प्रीमियम पॅकिंग बाजारात दाखल
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. २३ : दिवाळीच्या सणाला अवघे काही दिवस शिल्लक असल्याने बाजारपेठेत भेटवस्तूंच्या खरेदीची लगबग सुरू झाली आहे. नातेवाईक, मित्रमंडळी, व्यावसायिक भागीदार आणि कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट देण्यासाठी यंदा आकर्षक ड्रायफ्रूट पॅकिंगला पसंती दिली जात आहे.
विविध आकारांतील गिफ्ट बॉक्स, रंगीबेरंगी सजावटीच्या टोपल्या, प्रीमियम पॅकिंग आणि आकर्षक डिझाइनमधील ड्रायफ्रूट सेट बाजारात दाखल झाले आहेत. त्यामुळे मिठाईसोबतच आरोग्यदायी आणि आकर्षक भेटवस्तू देण्याकडे ग्राहकांचा कल असल्याचे चित्र आहे.
सोनेरी, लाल, निळ्या आणि इतर आकर्षक रंगांतील बॉक्समध्ये बदाम, काजू, पिस्ता, अक्रोड, खजूर यांसारख्या सुकामेव्याचे संच उपलब्ध आहेत. महागड्या आणि दर्जेदार भेटवस्तू देण्यासाठी खास डिझाइन केलेले बॉक्स, पारदर्शक झाकणांचे पॅकिंग व आकर्षक सजावटीचे पर्याय बाजारात आले आहेत. विविध प्रकारच्या ड्रायफ्रूटची मांडणी करून सजविलेल्या टोपल्या भेटवस्तू म्हणून ग्राहकांना आकर्षित करीत आहेत. २८० रुपयांपासुन १० हजार रुपयांपर्यंत मागणी नुसार पॅकिंग उपलब्ध केली जाते.
विशेष तयारी
दिवाळीच्या काळात कंपन्या, व्यापारी आणि विविध व्यावसायिकांकडून कर्मचारी, ग्राहक व व्यावसायिक भागीदारांना भेटवस्तू देण्याची परंपरा आहे. त्यामुळे ड्रायफ्रूट विक्रेत्यांसह गिफ्ट पॅकिंग करणाऱ्या व्यावसायिकांनी विविध प्रकारचे बॉक्स आणि सजावटीचे साहित्य उपलब्ध केले आहे.
चौकट
बजेटनुसार निवडीची संधी
बाजारात विविध किमतींमध्ये ड्रायफ्रूट गिफ्ट पॅक उपलब्ध होत आहेत. कमी बजेटमधील साध्या पॅकिंगपासून महागड्या प्रीमियम बॉक्सपर्यंत अनेक पर्याय असल्याने ग्राहकांना आपल्या बजेटनुसार भेटवस्तू निवडता येणार आहे. पॅकिंगचा दर्जा, त्यातील ड्रायफ्रूटचे प्रमाण, प्रकार आणि सजावट यानुसार किमतीत फरक पडतो.