(पान ४ ला मेन)
SGR26B07542
सोनगीर : दुष्काळग्रस्त भागाची पाहणी करताना मंडळातील महसूल व ग्रामपंचायत अधिकारी.
--------------
दुष्काळग्रस्त गावांत पिकांचे पंचनामे सुरू
दीडशे गावे, २० वाड्यांमध्ये प्रशासनाकडून पाहणी; १२ ऑक्टोबरपर्यंत अहवाल सादर करण्याचे आदेश
सकाळ वृत्तसेवा
सोनगीर, ता. ५ : धुळे तालुक्यात दुष्काळ जाहीर झालेल्या गावांमध्ये शेतीपिकांच्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामे करण्यास सुरुवात झाली आहे. यासाठी ग्रामपंचायत अधिकारी, ग्राममहसूल अधिकारी, मंडल अधिकारी, कृषी सेवक, विस्तार अधिकारी, सहायक कृषी अधिकारी आदींची नियुक्ती करण्यात आली आहे. तहसीलदार अरुण शेवाळे यांनी संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांना पंचनामे करून वस्तुनिष्ठ माहिती संकलित करण्याचे आदेश दिले आहेत.
-----------
धुळे तालुक्यातील १५ महसूल मंडळांतील १७० गावांपैकी १५० गावे आणि २० वाडे दुष्काळग्रस्त जाहीर करण्यात आले आहेत. धुळे शहर, सोनगीर, नेर, कुसुंबा, कापडणे, आनंदखेडे, देऊर (बु.), लामकानी, न्याहळोद, नावरा, गरताड, मुकटी, शिरूड, बोरकुंड आणि आर्वी या १५ मंडळांमध्ये पंचनाम्याची कार्यवाही सुरू आहे. पंचनाम्यासाठी सुमारे २०५ ग्रामपंचायत अधिकारी व तलाठी, २० मंडल अधिकारी व कृषी सेवक, ९६ सहायक कृषी अधिकारी आणि चार मंडळ कृषी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सहायक कृषी अधिकारी आणि मंडल कृषी अधिकाऱ्यांकडे एकापेक्षा अधिक गावांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
पाहणीदरम्यान पिकांची सद्यस्थिती, झालेले नुकसान, पेरणीचे क्षेत्र आणि दुष्काळाच्या तीव्रतेची वस्तुनिष्ठ माहिती संकलित केली जात आहे. मंडळ अधिकारी, ग्राममहसूल अधिकारी, कृषी सहाय्यक आणि ग्रामपंचायत अधिकारी समन्वयाने प्रत्यक्ष शेतांमध्ये पाहणी करून पंचनामे करणार आहेत. यामध्ये संबंधित शेताचा सर्वे क्रमांक, शेतकऱ्याचे नाव, पिकाचे नाव, पेरणी क्षेत्र, पिकांची सद्यस्थिती आणि दुष्काळाचा परिणाम याची नोंद केली जाणार आहे.
३३ टक्क्यांपासून नुकसानाची नोंद
गावनिहाय खरीप पिकांची स्थिती, सामान्य सिंचनाखालील क्षेत्र, प्रत्यक्ष पेरणी झालेले क्षेत्र आणि पेरणी न झालेले क्षेत्र यांची स्वतंत्र नोंद केली जाणार आहे. तसेच ३३ ते ५० टक्के आणि ५० टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झालेल्या क्षेत्राची हेक्टरनिहाय नोंद केली जाणार आहे. पाहणी केलेल्या क्षेत्रातील पिकांची प्रत्यक्ष स्थिती स्पष्ट करणारी छायाचित्रे, अक्षांश-रेखांश तसेच अन्य आवश्यक माहिती संकलित करून संपूर्ण अहवालाचे डिजिटल पद्धतीने संकलन केले जाणार आहे. बाधित शेतकऱ्यांचे अचूक बँक खाते क्रमांक, फार्मर आयडी किंवा आधार क्रमांकाचीही नोंद करण्यात येणार आहे. सर्व पंचनामे व संबंधित माहिती १२ ऑक्टोबरपर्यंत तहसील कार्यालयात जमा करण्याचे आदेश तहसीलदार अरुण शेवाळे यांनी दिले आहेत.