दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे
पिंपळगाव बसवंत पोलिसांकडून जनजागृती; दुचाकी, जनावरे, घरफोडीच्या घटनांबाबत सूचना
सकाळ वृत्तसेवा
पिंपळगाव बसवंत, ता. ९ ः कोरड्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर दुष्काळी परिस्थितीचा गैरफायदा घेत चोरीच्या घटनांमध्ये वाढ होण्याची शक्यता लक्षात घेता पिंपळगाव बसवंत पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. दुचाकी चोरी, जनावरांची चोरी, घरफोडी तसेच संशयास्पद व्यक्तींच्या हालचालींबाबत नागरिकांनी विशेष दक्षता घ्यावी, असे पोलिस निरीक्षक गणेश गुरव यांनी जनजागृती संदेशातून स्पष्ट केले आहे.
दुचाकी नेहमी सुरक्षित ठिकाणी पार्क करून हँडल लॉक करण्यासह अतिरिक्त लॉकचा वापर करावा. जनावरे रात्री सुरक्षित ठिकाणी बांधावीत तसेच गोठ्याच्या परिसरात पुरेशी प्रकाशव्यवस्था ठेवावी. घर बंद करून बाहेर जाताना दरवाजे-खिडक्या व्यवस्थित बंद करून कुलूप लावावे आणि शक्य असल्यास सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची व्यवस्था करावी. गावात किंवा परिसरात अनोळखी व्यक्ती संशयास्पदरीत्या फिरताना आढळल्यास त्याची माहिती तात्काळ पोलिसांना द्यावी. तसेच ग्रामसुरक्षा समिती, पोलीस पाटील व स्थानिक नागरिकांनी एकत्रितपणे गावात गस्त व जनजागृती करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
‘आपली सतर्कता- आपला गाव सुरक्षित’ हा संदेश देत पिंपळगाव बसवंत पोलिसांनी नागरिकांना सामूहिक सुरक्षेसाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले आहे. कोणतीही संशयास्पद घटना अथवा हालचाल आढळल्यास तातडीने ११२ क्रमांकावर संपर्क साधावा, असेही पोलिसांनी सांगितले.
--------------