दुष्काळसदृश स्थितीत वीजयंत्रणा सक्षमसाठी जिल्ह्यांना २० कोटी
---
वितरण रोहित्र, ‘स्पेशल डिझाइन ट्रान्स्फॉर्मर’ व ‘कॅपॅसिटर बँक’ खरेदीसाठी विशेष तरतूद
सकाळ वृत्तसेवा
नाशिक रोड, ता. ६ : राज्यातील दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना सिंचनासाठी सुरळीत वीजपुरवठा मिळावा, यासाठी राज्य शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. वितरण रोहित्र, ‘स्पेशल डिझाइन ट्रान्स्फॉर्मर’ (एसडीटी) आणि ‘कॅपॅसिटर बँक’ खरेदीसाठी जिल्हा नियोजन व विकास समितींतर्गत (डीपीडीसी) प्रत्येक जिल्ह्याला २० कोटी रुपयांपर्यंत विशेष निधी उपलब्ध करून देण्याच्या प्रस्तावास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य शासनाने मंगळवारी (ता. ६) मंजुरी दिली.
कमी पर्जन्यमानामुळे राज्यातील ३५८ पैकी २६५ तालुक्यांत दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे. ‘महावितरण’कडून राज्यातील सुमारे ४७ लाख कृषी ग्राहकांना विविध क्षमतेच्या वितरण रोहित्रांद्वारे वीजपुरवठा केला जातो. या पार्श्वभूमीवर वीजयंत्रणा सक्षम करण्यासाठी विशेष निधीतून तातडीने कामे हाती घेण्यात येणार आहेत.
यात अतिभारित किंवा नादुरुस्त वितरण रोहित्र बदलण्यासाठी नवीन रोहित्रांची खरेदी केली जाईल. कृषी वीजवाहिन्यांवरील घरगुती ग्राहक, तसेच शेतातील घरांना सुरळीत वीजपुरवठा मिळावा, यासाठी आवश्यकतेनुसार सिंगल फेज व थ्री फेज ‘स्पेशल डिझाइन ट्रान्स्फॉर्मर’ बसविण्यात येतील. तसेच, लांब अंतराच्या वीजवाहिन्यांवर कमी दाबाचा वीजपुरवठा होण्याची समस्या दूर करण्यासाठी आवश्यकतेनुसार ‘कॅपॅसिटर बँक’ बसविण्यात येणार आहेत.
स्थानिक गरजेनुसार आवश्यक कामांची तांत्रिक तपासणी करून ‘महावितरण’च्या अधीक्षक अभियंता कार्यालयामार्फत अंदाजपत्रके तयार केली जाणार आहेत. ही अंदाजपत्रके संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करण्यात येतील. दुष्काळसदृश परिस्थितीत शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी या कामांना जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत तातडीने प्रशासकीय मान्यता देण्यात येणार आहे.
या कामांच्या मान्यतेचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले असून, मंजूर निधीच्या विनियोगाचा अहवाल ‘महावितरण’च्या अधीक्षक अभियंता कार्यालयाला विहित कालावधीत जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करावा लागणार आहे. त्यामुळे दुष्काळसदृश परिस्थितीत सिंचनासाठी वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासह ग्रामीण भागातील वीज वितरण यंत्रणा अधिक सक्षम होण्यास मदत होईल.