पान-४ संक्षिप्त
---------
वीज खांबावरील
तारेचीच चोरी
सिन्नर ः सिन्नर- शिर्डी मार्गावरील कुंदेवाडी फाटा ते कचरा डेपो या सुमारे एक किलोमीटर लांब वीज खांबांवरील अॅल्युमिनिअमची वीज तार चोरीस गेली आहे. याबाबत वायरमन वैभव थोरे यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे. चोरट्याने या तारा काढून नेल्याने परिसरातील वीजपुरवठ्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत.
---------------
कोनांबे येथून
वीजपंपाची चोरी
सिन्नर ः कोनांबे येथे पाच अश्वशक्तीच्या वीज पंपासह ७० फूट अंतराची तांब्याची केबलही चोरी झाली आहे. बाळासाहेब डावरे यांनी पोलिसांत चोरीबाबत फिर्याद दिली आहे. चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अगोदर जवळच्याच शिवडे गावच्या शिवारात वीजपंप चोरीला जाण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. कोनांबे, सोनांबे शिवारातही वीजपंप चोरी जात असल्याने शेतकऱ्यांत चिंता व्यक्त केली जात आहे.
---------------
विषारी औषध
घेऊन आत्महत्या
सिन्नर ः मलढोण येथील गोरक्षनाथ मनाजी पावले (५०) यांनी विषारी औषध सेवन केल्याने त्यांना येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. पोलिस उपनिरीक्षक सोनवणे घटनेचा तपास करत आहेत.
-----------
नांदूरशिंगोटे येथे
कुजलेला मृतदेह
सिन्नर ः नांदूरशिंगोटे येथील खदानीत कुजलेल्या स्थितीत मृतदेह मिळून आला. सुहास पांडुरंग आगीवले (३०) याचा हा मृतदेह आहे. सुहास गतिमंद होता. तो घरात नसल्याने त्याचा शोध घेतला जात होता. तथापि, शिवारातच त्याचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत मिळून आला. घटनेबाबत हवालदार निरगुडे तपास करत आहेत.
----------------