वडाळ्यात तब्बल एक कोटीची वीजचोरी
तिघांविरुद्ध गुन्हा दाखल; वर्षभर कारखान्यासाठी वापर
सकाळ वृत्तसेवा
इंदिरानगर, ता. ९ : वडाळा भागात वर्षभर प्लॅस्टिक दाणे निर्मिती कारखाना आणि बर्फ कारखान्यासाठी तब्बल ४ लाख ६० हजार ९६७ युनिट चोरीची वीज वापरून महावितरण कंपनीचे बील आणि दंड मिळून सुमारे १ कोटी रुपयांचे आर्थिक नुकसान केल्याप्रकरणी तिघांविरुद्ध वीज कंपनीने गुन्हा दाखल केला आहे. नाशिक रोड पोलिस ठाण्यात दाखल झालेला हा गुन्हा पुढील तपासासाठी इंदिरानगर पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे.
वडाळा गावातील मदिनानगर भागात मोहम्मद फारुख खान (५०), कौसर परवीन मकसूद खान (५३, रा. कठडा आणि राहील उर्फ माझ हमीद शेख (२६, रा. द्वारका) हे प्लॅस्टिकचे दाणे बनवण्याचा कारखाना चालवतात. १ ऑक्टोबर २०२५ ते ३० सप्टेंबर २०२६ या एक वर्षाच्या काळात या कारखान्यासाठी त्यांनी तब्बल ३ लाख ३२ हजार ६३६ युनिट चोरीची वीज वापरली. ही वीज चोरी पकडल्यानंतर कंपनीतर्फे मूळ बिल आणि दंड मिळून ७० लाख १३ हजार २४० रुपयाचे बिल त्यांना बजावले होते. मात्र ते त्यांनी भरले नाही. या तिघांचा याच भागात बर्फ कारखाना आहे. त्यासाठीदेखील त्यांनी चोरीची १ लाख २८ हजार ३३१ युनिट वीज वापरले. त्यासाठीचे दंडासह असणारे २७ लाख ५ हजार ९६० रुपयांचे बिल कंपनीने त्यांना बजावले होते. मात्र तेदेखील भरले नाही. त्यामुळे कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी फिर्याद नोंदवत रीतसर वीज चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. ३० सप्टेंबरला भरारी पथकातर्फे उपरोक्त दोन्ही कारखान्यांवर छापा टाकल्याचे समजते. त्याच वेळेस संपूर्ण शहनिशा करून दंडाची आकारणी केली होती. मात्र दंड भरला नाही तर नियमाप्रमाणे गुन्हा दाखल केला जातो, त्या अनुषंगाने गुन्हा दाखल केला आहे. वडाळ्यात मोठ्या प्रमाणात विनापरवानगी भंगार गुदामे आहेत. शहरातून प्लॅस्टिक येथे जमा होते. मूळतः प्लॅस्टिक दाणे तयार करण्याचे कारखाने येथे आहेत. उपरोक्त घटनेत चोरी केलेली वीज वर्षभरासाठी किमान ५ हजार कुटुंबांना पुरली असती असे जाणकार सांगतात. नावापुरते एक मीटर घ्यायचे. त्याच्यावर तात्पुरत्या वस्तू वापरायच्या आणि संपूर्ण कारखान्यातील मशीनरीसाठी विविध पर्याय वापरून चोरीची वीज वापरायची. असे सर्रास उद्योग या भागात चालतात, असे नागरिकांचे म्हणणे आहे.
---चौकट
वीज पुरणार किती?
महावितरण कंपनीने एकदा ऑल आउट ऑपरेशन राबवत या संपूर्ण परिसरातील वीज चोरी एकाच वेळी ओळखली, तर इंदिरानगर आणि वडाळा भागातील विजेचा प्रश्न कायमचा सुटेल अशा प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केल्या आहेत. या भागात वीज टंचाई रोखण्यासाठी नुकतेच उपकेंद्र कार्यान्वित केले आहे. मात्र अशी चोरी होत असेल तर ती वीज पुरणार किती, असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.