फोटो : 31770
नाशिक : जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना निवेदन देताना भगवान बोराडे, कैलास बोरसे, दिलीप पाटील, बाळासाहेब बोरस्ते, रमेश बोरस्ते.
…
कर्जमाफीपासून वंचित ५५ हजार शेतकऱ्यांना दिलासा द्या
दोन हजार ५० कोटींच्या थकबाकीचा अहवाल; चार तालुक्यांत ५६ टक्के खाते
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. ८ : राज्य शासनाने आतापर्यंत चार वेळा कर्जमाफी केली; मात्र त्याचा एकदाही लाभ न मिळालेल्या जिल्ह्यातील ५५ हजार १९९ शेतकऱ्यांची माहिती संकलित करण्यात आली आहे. या शेतकऱ्यांकडे ९०८ कोटी रुपयांची थकीत मुद्दल असून, त्यावरील एक हजार ६६२ कोटी रुपयांच्या व्याजासह एकूण दोन हजार ५० कोटी रुपयांची थकबाकी आहे. या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्याची मागणी शेतकरी समन्वय समितीने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
शेतकरी समन्वय समितीचे अध्यक्ष भगवान बोराडे, आदिवासी सहकारी संस्थेचे राज्य अध्यक्ष कैलास बोरसे, सदस्य दिलीप पाटील, बाळासाहेब बोरस्ते, रमेश बोरस्ते व मनोहर पाटील यांनी यासाठी आंदोलन केले. आंदोलनाची दखल घेत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी आतापर्यंतच्या कर्जमाफीपासून वंचित शेतकऱ्यांची माहिती संकलित करण्यासाठी समिती स्थापन केली होती. या समितीने २००८ ते २०२६ या कालावधीतील कर्जमाफी योजनांचा अभ्यास केला.
निसर्गाची अनिश्चितता, हवामानातील बदल तसेच द्राक्ष, कांदा, डाळिंब आणि भाजीपाल्याच्या दरातील घसरणीमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळे यापूर्वीच्या कर्जमाफी योजनांमधून वगळलेल्या सर्व शेतकऱ्यांचा समावेश असलेली व्यापक कर्जमाफी योजना राबवावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच थकीत मुद्दल सुलभ हप्त्यांत भरण्याची एकरकमी कर्जफेड योजना सहकारी पतसंस्थांच्या माध्यमातून राबवावी, अशी शिफारस अहवालात करण्यात आली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी हा अहवाल राज्याच्या सहकार विभागाकडे पाठविल्याचे शेतकरी संघटनेने म्हटले आहे.
चार तालुक्यांत ५६ टक्के खाती
जिल्ह्यातील ५५ हजार १९९ शेतकऱ्यांकडे दोन हजार ५० कोटी रुपयांची थकबाकी आहे. त्यापैकी दिंडोरी, निफाड, येवला आणि मालेगाव या चार तालुक्यांतील खात्यांचे प्रमाण ५६ टक्के आहे. या चार तालुक्यांतील शेतकऱ्यांकडे तब्बल ७९७ कोटी रुपयांची थकबाकी आहे. त्यामुळे शासनाने या अहवालाचा गांभीर्याने विचार करून कर्जमाफीबाबत तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.