सोने स्थिर; चांदीत
हजाराची घसरण
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. ८ : सध्याच्या पितृपक्षामुळे सोन्या-चांदीला मागणी कमी झाली आहे. यामुळे सोने व चांदीचे भाव सातत्याने कमी होत आहेत. बुधवारी (ता. ७) चांदीच्या भावात हजाराने वाढ झाली होती. गुरुवारी (ता. ८) सोने स्थिर असून, चांदीच्या भावात हजार रुपयांची घसरण झाली.
पितृपक्षात मौल्यवान वस्तू खरेदी करण्याचे टाळले जाते याचा परिणाम सुवर्ण बाजारात दिसून येत आहे. आठवडाभरापासूनच सोने व चांदीचे भाव सातत्याने कमी होत आहेत. याशिवाय आंतरराष्ट्रीय बाजारात होत असलेल्या बदलाचा परिणामही सोन्या-चांदीच्या बाजारात होत आहे. गेल्या आठवडाभरापासून सोने व चांदीच्या भावात सातत्याने घसरण होऊन सोने दीड लाखाखाली आले, तर चांदी दोन लाख ३० हजार रुपयांखाली आली आहे.
चांदीत हजाराची घसरण
आठवड्याच्या सुरुवातीलाच भाव खाली येत असून, गुरुवारीही भाव कमी झाले. बुधवारी सोन्याचा भाव एक लाख ४८ हजार रुपये (प्रतिदहा ग्रॅम, विनाजीएसटी) होता. गुरुवारी सोन्याचे भाव ‘जैसे थे’ होते. चांदीचा भाव दोन लाख २६ हजार (प्रतिकिलो विनाजीएसटी) रुपयांवर होता. त्यात हजार रुपयाची घसरण होऊन चांदी दोन लाख २५ हजार रुपयांपर्यंत खाली आली आहे.