NSK26H33396
जळगाव : प्रभागातील समस्या नगरसेवक विशाल भोळे, चंद्रशेखर अत्तरदे, तसेच नगरसेविका अंकिता पाटील यांच्याकडून जाणून घेताना महापौर दीपमाला काळे.
.........
धूळखात वाहने हटवा, गटारींची सफाई करा
प्रभाग सातमध्ये महापौरांची पाहणी; अतिक्रमणे हटविण्याचे निर्देश
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. २३ : शहरातील स्वच्छता, अतिक्रमणे आणि नागरी सुविधांशी संबंधित समस्यांवर थेट कारवाई करण्यासाठी महापौर दीपमाला काळे यांनी महापौर स्वच्छता संकल्प अभियानांतर्गत शुक्रवारी (ता. २३) प्रभाग क्रमांक सातमध्ये पाहणी केली. या दौऱ्यात ठिकठिकाणी अस्वच्छ गटारी, रस्त्यांना अडथळा ठरणाऱ्या बंद टपऱ्या, धूळखात पडलेली वाहने आणि पिण्याच्या पाण्याची नासाडी आढळली. या समस्यांवर तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश महापौरांनी संबंधित विभागांना दिले.
गणेश कॉलनी चौकातील गुरुदत्त मंदिर परिसरात रस्त्यालगत बंद अवस्थेत असलेल्या टपऱ्यांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत असल्याचे दिसून आले. या टपऱ्या तातडीने हटविण्याच्या सूचना महापौरांनी दिल्या. प्रभागातील काही ठिकाणी गटारींची नियमित सफाई झाली नसल्याचे, तर काही ठिकाणी गटारींवर अतिक्रमणे झाल्याचेही निदर्शनास आले. आरोग्य आणि बांधकाम विभागाने समन्वय साधून गटारींची स्वच्छता करावी तसेच अतिक्रमणांचा प्रश्न मार्गी लावावा, असे निर्देश देण्यात आले. या पाहणी दौऱ्यात नगरसेवक चंद्रशेखर अत्तरदे, विशाल भोळे, नगरसेविका अंकिता पाटील, आरोग्य विभागाचे अभियंता समीर बोरोले, बांधकाम विभागाचे विशाल सुर्वे यांच्यासह महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
चौकट
धूळखात वाहनांवर कारवाईचे आदेश
बजरंग बोगदा परिसरात पडून असलेले साहित्य, अतिक्रमणांचे सांगाडे आणि वाढलेले गवत तातडीने हटविण्याच्या सूचना देण्यात आल्या. याच परिसरात तीन ठिकाणी बंद अवस्थेत असलेली तीन ते चार चारचाकी वाहने आढळली. ही वाहने हटविण्यासाठी आवश्यक कारवाई करण्याचे निर्देशही महापौरांनी दिले.