तीन वर्ष एलएलबीला अभ्यासक्रमासाठी
१८ हजार विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. ५ः शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी ३ वर्ष कालावधीच्या विधी पदवी अभ्यासक्रम (एलएलबी) च्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेची तिसरी फेरी संपली आहे. यानंतरच्या संस्थात्मक फेरीचा मंगळवारी (ता.६) शेवटचा दिवस आहे. राज्यातील २२४ विधी महाविद्यालयामध्ये उपलब्ध २३ हजार ४६८ पैकी १८ हजार २८० जागांवर विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले आहेत. उर्वरित ५ हजार १८८ रिक्त जागा संस्थात्मक फेरीसाठी उपलब्ध आहेत.
राज्यात ३ वर्षीय विधीच्या अभ्यासक्रमासाठीच्या प्रवेशासाठी ४९ हजार ८४३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. तिसऱ्या फेरीच्या वाटपासाठी राज्यात २२४ विधी महाविद्यालयात १२ हजार ७६७ जागा उपलब्ध होत्या, यापैकी ११ हजार ७५६ विद्यार्थ्यांना तिसऱ्या फेरीत विविध पसंतीक्रमाच्या महाविद्यालयामध्ये प्रवेशाची संधी होती. यातून ५ हजार ८८४ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष प्रवेश घेतला. तिन्ही फेऱ्या मिळून एकूण १४ हजार १६१ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. यानंतर मंगळवार (ता.६) पर्यंत संस्थात्मक फेरीचे प्रवेश सुरु असतील. यामध्ये सद्यःस्थितीत ४ हजार ११९ विद्यार्थ्यांनी संस्थात्मक फेरीत प्रवेश घेतला आहे.
---
फेरीनिहाय झालेले प्रवेश असे-
पहिली फेरीः ५ हजार ७६५
दुसरी फेरीः २ हजार ५१२
तिसरी फेरीः ५ हजार ८८४
---