NSK26H31743
अमळनेर : महापारेषणच्या दालनाच्या भेटीप्रसंगी वस्त्रोद्योगमंत्री संजय सावकारे, खासदार स्मिता वाघ, रावेरचे आमदार अमोल जावळे, विधानपरिषद सदस्य नंदकिशोर महाजन यांनी माहिती पुस्तिका देताना जनसंपर्क अधिकारी डॉ. मिलिंद आवताडे.
---
अमळनेरमध्ये महापारेषणच्या
दालनाला उत्स्फूर्त प्रतिसाद
----------------------
सुमारे आठ हजार अभ्यागतांची भेट
सकाळ वृत्तसेवा
अमळनेर, ता. ८ : केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना आणि उपक्रमांची माहिती देणाऱ्या तीन दिवसीय प्रदर्शनात महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीच्या (महापारेषण) आकर्षक दालनाला अभ्यागतांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आतापर्यंत सुमारे आठ हजार जणांनी दालनाला भेट दिली. खासदार स्मिता वाघ, वस्त्रोद्योगमंत्री संजय सावकारे, रावेरचे आमदार अमोल जावळे आणि विधानपरिषद सदस्य नंदकिशोर महाजन यांनीही दालनाला भेट देऊन महापारेषणच्या कार्याचे व तांत्रिक प्रगतीचे कौतुक केले.
येथील कलागुरू मंगल कार्यालयात ७ ते ९ ऑक्टोबरदरम्यान हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. महापारेषणच्या दालनात कंपनीची प्रगती, ध्येय-उद्दिष्टे आणि सन २०३० पर्यंतच्या नियोजनाची माहिती डिजिटल माध्यमातून सादर करण्यात आली आहे.
महापारेषणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विक्रम कुमार (भा.प्र.से.) यांच्या नेतृत्वाखाली हे दालन साकारण्यात आले आहे. त्यासाठी संचालक (संचलन) सतीश चव्हाण, संचालक (प्रकल्प) दत्तात्रय पडळकर, संचालक (वित्त) तृप्ती मुधोळकर आणि अपर जिल्हाधिकारी तथा कार्यकारी संचालक (मानव संसाधन) सुचिता भिकाने यांचे मार्गदर्शन लाभले.
चौकट
विद्यार्थ्यांनी जाणून घेतली उपक्रमांची माहिती
ड्रोन व मोबाइल ॲपच्या साहाय्याने पारेषण वाहिन्यांची गस्त आणि तपासणी, तसेच एमटीएएमसी उपकेंद्र स्वयंचलन प्रणाली यांसारख्या नावीन्यपूर्ण उपक्रमांची माहिती अभ्यागतांना देण्यात येत आहे. शाळा-महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांसह नागरिक आणि महिलांनी मोठ्या संख्येने भेट देऊन या उपक्रमांविषयी जाणून घेतले. दरम्यान, प्रदर्शनात केंद्र व राज्य पातळीवरील ७५ हून अधिक संस्था सहभागी झाल्या आहेत.