गुन्हे वृत्त
---
कुकाणे येथील
तरुणाचा मृत्यू
मालेगाव ः कुकाणे (ता. मालेगाव) येथील रोशन प्रभाकर मगर (वय २६) यांनी ३० सप्टेंबरला सायंकाळी साडेसातच्या सुमारास विषारी औषध सेवन केले. त्यांची प्रकृती बिघडल्याने मामा वसंत चव्हाण यांनी त्यांना येथील सुविधा हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. त्यानंतर ३ ऑक्टोबरला त्यांना सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉ. फैजी यांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. याप्रकरणी वडनेर खाकुर्डी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
---
गिरणा डॅम परिसरातून
तांब्याची तार चोरीला
मालेगाव ः येसगाव बुद्रुक शिवारातील डोममळी गिरणा डॅमच्या बॅकवाटॅर येथून चोरट्याने दहा हजारांची तांब्याची तार चोरून नेली. १ ऑक्टोबरच्या सायंकाळी सात ते २ ऑक्टोबरच्या सकाळी आठच्या दरम्यान हा प्रकार घडला. धर्मा त्र्यंबक जगताप (वय ६५, रा. निमगाव खुर्द) यांच्या तक्रारीवरून तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
---
साईबाबा कॉलनीतील
एकाचा मृत्यू
मालेगाव ः येथील साईबाबा कॉलनीतील संजय राजधर बच्छाव (वय ५६, रा. पीडब्ल्यूडी ऑफिसजवळ) यांची ४ ऑक्टोबरला अचानक तब्येत बिघडल्याने नातेवाईक नवनीत पाटील यांनी त्यांना येथील सामान्य रुग्णालयात दाखल केले. डॉ. आमीन यांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. कॅम्प पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे.
---
वाढदिवसाच्या कार्यक्रमात
आलेल्या व्यक्तीचा मृत्यू
मालेगाव ः निंबारपाडा (ता. सुरगाणा) येथील हरी सोनजी पवार (वय ५०) हे येथील भायगाव शिवारातील मुलीकडे वाढदिवसाच्या कार्यक्रमानिमित्त आलेले होते. ४ ऑक्टोबरला सकाळी सहाला त्यांना हृदयविकाराचा त्रास झाला. जावई विकास गावित यांनी त्यांना प्रथम प्रयास हॉस्पिटल व नंतर सामान्य रुग्णालयात दाखल केले. डॉ. आशिष यांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. वडनेर खाकुर्डी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे.
---
अप्सा कॉलनीत
गुटखा जप्त
मालेगाव ः येथील अप्सा कॉलनीतील इब्राहिम मशिदजवळ पोलिसांनी छापा टाकून ८० हजार ७९६ रुपयांचा विविध कंपन्यांचा गुटखा, तंबाखूचे पाऊच जप्त केले. ३ ऑक्टोबरला रात्री सव्वाआठच्या सुमारास संबंधित कारवाई करण्यात आली. अन्न सुरक्षा अधिकारी सोनल पाडळे यांच्या फिर्यादीवरून द्याने रमजानपुरा पोलिस ठाण्यात शेख बिलाल शेख शौकत (वय ४०) व अफजल टोपी (पूर्ण नाव माहीत नाही) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.