(मंत्री गुलाबराव पाटील यांचे संग्रहित छायाचित्र वापरावे)
---
म्हसावद उड्डाणपुलाला ४५.८२ कोटींची सुधारित प्रशासकीय मान्यता
---
पालकमंत्री पाटील यांच्या पाठपुराव्याला यश; वाढीव २०.८२ कोटींच्या खर्चास मंजुरी
सकाळ वृत्तसेवा
पाळधी/जळगाव, ता. ८ : जळगाव तालुक्यातील म्हसावद व परिसरातील हजारो शेतकरी, ग्रामस्थ आणि वाहनधारकांच्या दृष्टीने महत्त्वाच्या रेल्वे उड्डाणपुलाच्या पूर्णत्वातील मोठा प्रशासकीय अडथळा अखेर दूर झाला आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे म्हसावद रेल्वे उड्डाणपुलाच्या ४५ कोटी ८२ लाख रुपयांच्या सुधारित अंदाजपत्रकास राज्य शासनाने प्रशासकीय मान्यता दिली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने गुरुवारी (ता. ८) याबाबत शासन निर्णय निर्गमित केला असून, मूळ मंजूर २५ कोटी रुपयांच्या खर्चात झालेल्या २० कोटी ८२ लाख रुपयांच्या वाढीस मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे सुमारे ७० टक्के काम पूर्ण झालेल्या उड्डाणपुलाच्या उर्वरित कामाचा मार्ग मोकळा झाला आहे.
म्हसावदजवळील सावखेडाफाटा-धरणगाव-एरंडोल-नेरी-जामनेर राज्य महामार्ग क्रमांक ४१ वरील रेल्वे उड्डाणपुलाच्या बांधकामासाठी पालकमंत्री पाटील यांच्या प्रयत्नांतून २५ फेब्रुवारी २०२० ला २५ कोटी रुपयांची मूळ प्रशासकीय मान्यता मिळाली होती. त्यानुसार काम सुरू झाले. मात्र बांधकाम खर्चातील वाढ, वस्तू व सेवा कर, विमा शुल्क आणि अन्य तांत्रिक बाबींमुळे मूळ मंजूर रक्कम अपुरी पडत होती. यामुळे प्रकल्पाच्या सुधारित प्रशासकीय मान्यतेसाठी पालकमंत्री पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला.
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली ५ ऑगस्ट २०२६ ला मुंबईत झालेल्या व्यय अग्रक्रम समितीच्या बैठकीत सुधारित प्रशासकीय मान्यतेचा प्रस्ताव विचारात घेतला होता. त्यानंतर १९ ऑगस्टला संबंधित विभागाला आवश्यक निर्देश दिले. वित्त विभागाच्या सहमतीनंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने शासन निर्णय ८ ऑक्टोबर नुसार ४५ कोटी ८२ लाख रुपयांच्या सुधारित अंदाजपत्रकास मंजुरी दिली. या निर्णयामुळे प्रकल्पाच्या वाढीव खर्चाला प्रशासकीय मान्यता मिळण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे.
चौकट
पाठपुरावा सुरूच राहील : मंत्री पाटील
सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाल्यामुळे उर्वरित कामाला गती देणे शक्य होणार असून, हा पूल तत्काळ नागरिकांच्या सेवेत आणण्यासाठी आपला पाठपुरावा सुरूच राहील, असे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले.