मंत्र्यांच्या कार्यालयात अधिकारी
वाढविणे अयोग्य : सुभाष गांगुर्डे
नंदुरबार, ता. ५ : बळीराजावर निसर्गाने अवकृपा केल्याने राज्यातील ३५८ तालुक्यात दुष्काळ जाहीर झाला आहे. नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी क्षेत्रिय पातळीवर सरकारी कर्मचारी रात्रंदिवस झटत आहेत. त्यासाठी मोठ्या प्रमाणात कर्मचारी फिल्डवर उपलब्ध असणे अत्यावश्यक आहे. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करुन मंत्री आस्थापनेवर अधिकारी वाढविण्याची मागणी मंत्र्यांकडून केली जात असून, ती अयोग्य असल्याची टीका महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती महासंघाचे सरचिटणीस सुभाष गांगुर्डे यांनी केली आहे.
प्रसिद्धीपत्रकात गांगुर्डे यांनी म्हटले आहे की, मुख्यमंत्र्यांनी मंत्री आस्थापनेवर अतिरिक्त व अनावश्यक उसनवार तत्वावरील शासकीय तसेच, खासगी लोकांच्या नियुक्तीला चाप लावला आहे. संबंधित कर्मचाऱ्यांना त्यांच्या मुळ विभागात तातडीने परत पाठविण्यात यावे, अन्यथा त्यांचे वेतन रोखण्यात येईल, असा आदेश त्यांनी दिला आहे. सरकारी कर्मचाऱ्यांची विविध विभागातील ५० टक्क्यापेक्षा जास्त पदे सरकारने कर्मचारी संघटनांना विश्वासात न घेता व्यपगत केल्यामुळे कर्मचाऱ्यांवर कामाचा बोजा वाढला. विविध विभागांमध्ये निवृत्तीनंतर रिक्त होणारी पदे भरती न केल्याने तसेच प्रतिनियुक्ती, उसनवारीवर नियुक्ती मिळवून घेणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांमुळे मुळ विभागात बोटावर मोजण्याइतकेच कर्मचारी शिल्लक राहिले. कर्मचाऱ्यांची लाखो पदे रिक्त असतांना मंत्री आस्थापनेवर अनावश्यक नियुक्त्या करण्यात येऊ नयेत, असेही श्री. गांगुर्डे यांनी म्हटले आहे.