अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; लग्नासाठी धर्मांतराचा दबाव
भद्रकाली पोलिसांत पॉक्सोसह धर्मांतरविरोधी कायद्यांतर्गत पहिला गुन्हा दाखल
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. ४ : अल्पवयीन पीडितेच्या असहायतेचा गैरफायदा घेत संशयिताने लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. पीडितेने लग्नासाठी तगादा लावला असता संशयिताने तिचे अश्लील फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत धर्मांतरासाठी दबाव टाकल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी भद्रकाली पोलिसांत पॉक्सोसह धर्मांतरविरोधी कायद्यांतर्गत शहरातील पहिला गुन्हा दाखल करण्यात आला असून, संशयित पसार झाला आहे.
२०२१ मध्ये अल्पवयीन पीडितेची अमन नामक संशयितासोबत सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख झाली होती. अकरावीत शिक्षण घेणाऱ्या पीडितेशी संशयिताने जवळीक साधत तिला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढले. याचदरम्यान तिच्या वडिलांचे अकस्मात निधन झाल्याने तिच्या या असहायतेचा गैरफायदा घेत संशयिताने तिला लग्नाचे आमिष दाखवून तिचे तीस वेगवेगळ्या ठिकाणी नेत लैंगिक शोषण सुरू केले.
दरम्यान, पीडिता १८ वर्षांची झाली असता, तिने संशयिताकडे लग्नासाठी तगादा लावला. त्या वेळी मात्र संशयित अमन याने तिचे अश्लील फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. तसेच लग्नासाठी तिच्यावर धर्मांतर करण्याचा दबाव टाकल्याचे पीडितेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, तर अश्लील फोटो व व्हिडिओ नष्ट करण्यासाठी संशयिताने पीडितेकडे पैशाची मागणी केली. संशयिताकडून वारंवार होणारी छळवणूक व त्रासाला कंटाळून अखेर पीडितेने भद्रकाली पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यानुसार, संशयिताविरोधात पॉक्सोसह धर्मांतरविरोधी कलमान्वये शहर आयुक्तालयात पहिला गुन्हा दाखल झाला आहे. संशयित अमन पसार झाला असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत.