स्वयंभू कलावंत : नाना ओक

स्वयंभू कलावंत : नाना ओक
Published on: 
फोटो -NSK26H31356 स्वयंभू कलावंत : नाना ओक ------------------------ नाशिकमधील जुन्या संगीतप्रेमी मंडळींमध्ये नाना ओक हे उत्तम तबला वादक म्हणून सुपरिचित होते. तीन वर्षांपूर्वी त्यांच्या जन्मशताब्दीपूर्तीच्या पार्श्‍वभूमीवर सुरू झालेल्या संगीत संमेलनाचे हे तिसरे वर्ष. तसेच ओक परिवार व कोलकाता येथील आयटीसी संगीत रिसर्च ॲकॅडमीच्या संयुक्त विद्यमाने दुसरे मिनी संगीत संमेलन ७ व ८ ऑक्टोबरला नाशिकच्या कुर्तकोटी सभागृहात होत आहे, त्यानिमित्त... - मकरंद ओक, नाशिक खरे तर आमच्या ओक घराण्यात सगळ्यांनाच संगीताची आवड. प्राचार्य असलेले माझे मोठे काका उत्तम सतार वाजवायचे, तर धाकटे काका (अर्चनचे वडील) भावगीते उत्तम गायचे. पण या मध्ये माझे वडील नाना ओक (नारायण गंगाधर ओक) यांनी तबला वादनाची कला जोपासली. मेन रोडचे गणपती मंदिर हे नाशिकमधील कलाकारांचे बैठकीचे ठिकाण. दर गुरुवारी रात्री आठ वाजता तिथे संगीताची मैफल रंगायची आणि नाना सगळ्यांच्या साथीला असायचे. त्या वेळी नाशिकमध्ये आलेल्या अनेक दिग्गज कलाकारांबरोबर नानांनी तबल्याची साथ केली. दुसरी बैठक असायची ती मेन रोड वरीलच ‘बग्याभाऊं’च्या बजरंग हॉटेलमध्ये. सकाळी गरम गरम जिलेबीचा घाणा काढणारे ‘बग्याभाऊ’ संध्याकाळी त्याच ठिकाणी गाण्याची बैठक जुळवायचे. पांढरे शुभ्र लोड, चादरी, पानांचा डबा असा राजेशाही थाट असायचा आणि मग नाना, बग्याभाऊ, रामभाऊ कुलकर्णी, दादा फडके यांची मैफील रंगायची. प्रत्येकाचे आवाज असे खणखणीत की ‘धुमाळ चौका’मधून तो सर्वदूर पसरायचा. नानांसह हे सगळेच कलाकार स्वयंभू होते, कोणाकडेही शिकले नव्हते पण नाशिकचे संगीत क्षेत्र त्यांनी उजळून काढले होते. लोकहितवादी मंडळाच्या वतीने पेठे विद्यालयात शास्त्रीय संगीत आणि नाट्य संगीत स्पर्धा व्हायच्या. राजा काळे, अजित कडकडे, सारखे दिग्गज पण त्या वेळचे युवा कलाकार या स्पर्धेत गाऊन गेले, अनेक वर्ष नानांनी या स्पर्धकांना साथ केली. नाशिक नगरपालिकेत जकातसारख्या खात्यात असूनही अत्यंत सचोटीचे अधिकारी म्हणून त्यांनी लौकिक जोपासला होता. नगरपालिकेतून निवृत्त झाल्यावर आपली संगीत सेवा त्यांनी अधिकच वृद्धिंगत केली. दर सोमवारी संध्याकाळी आमच्या घरी गायनाची मैफील जमत असे. नाशिकमधील सर्व नवे जुने कलाकार या मैफिलीत रंग भरत असत. निवृत्तीनंतर त्यांनी नवोदितांना तबल्याचे धडे द्यायला पण सुरुवात केली. अनेक मुले नानांकडे तबला शिकून गेली. पण मी घरात असून तबला काढून बसलो नाही, पण नानांनी मला त्रिवेदी सरांकडे (विष्णू संगीत विद्यालय) तबला शिकण्यासाठी आवर्जून पाठवले. त्यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह उभी केलेली ‘वैवस्वत’ ही संस्था अनेक वर्ष नव्या जुन्या कलाकारांच्या मैफली आयोजित करत असे. नानांच्या जन्म शताब्दीपूर्ती निमित्त तीन वर्षापूर्वी सुरू केलेल्या या संगीत संमेलनाची ही ज्योत आम्ही ओक कुटुंबीय अशीच तेवत ठेवू आणि नाशिककर संगीत प्रेमींची संगीताची भूक भागवण्याचा छोटासा प्रयत्न सतत चालू ठेवू.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com