फोटो : H31772
शास्त्रीय गायन, सरोद वादनाची रसिकांना पर्वणी
‘नाना ओक स्मृती मिनी’ संगीत संमेलनाचा समारोप
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. ९ : ओक परिवार आणि आयटीसी संगीत रिसर्च अकादमी (कोलकाता) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘नाना ओक स्मृती मिनी’ संगीत संमेलनाचा शुभारंभ ७ ऑक्टोबरला गंगापूर रोडवरील डॉ. कुर्तकोटी सभागृहात झाला. पहिल्याच दिवशी रंगलेल्या सुरेल मैफलीत बंगाल आणि महाराष्ट्राला जोडणाऱ्या सुरांनी नाशिककर रसिकांना भुरळ घातली. या संमेलनाची सुरुवात पं. सुरेश तळवलकर, मकरंद ओक आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. संयोजक अर्चन ओक यांनी स्वागत व प्रास्ताविक केले, तर स्मिता जोगळेकर यांनी सूत्रसंचालन केले.
संमेलनाच्या पहिल्या सत्रात श्रेया चॅटर्जी यांचे शास्त्रीय गायन झाले. त्यांनी राग शंकरामध्ये ‘आदी महादेव बीन बजाई...’ ही पारंपरिक बंदिश सादर करून रसिकांची दाद मिळवली. यानंतर राग हमीर आणि राग पिलूमधील ‘करे ना बिरहा की रात...’ ही ठुमरी सादर करत मैफलीत रंग भरला. त्यांना आशय कुलकर्णी यांनी तबल्यावर, अमेय बिच्चू यांनी संवादिनीवर आणि श्रावणी बायल यांनी तानपुऱ्यावर साथसंगत केली. उत्तरार्धात अबीर हुसेन यांच्या प्रभावी सरोद वादनाने श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. त्यांना यशवंत वैष्णव यांनी दमदार तबलासाथ केली. संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी पं. उल्हास कशाळकर यांचे गायन झाले. भारावलेल्या वातावरणात दोन दिवसांच्या संमेलनाचा सुरेल समारोप झाला. अखेरच्या सत्रात पं. कशाळकर यांनी सुरुवातीपासून मैफलीचा ताबा घेतला. त्यांच्या आवडत्या नंद रागातील बडा ख्याल विलंबित तीन तालात ‘ए बारे सैया’ दृत तीन तालात ‘धन धन भाग नंद को’ या बंदिशी रंगल्या. नंतर पंचम मालकंसमध्ये ‘नदीया पार करो’ ही रूपक तालातील बंदिश, दृत तीन तालात तराणा, शेवटी भवानी दयानी.. या भैरवीने पंडितजींनी श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. त्यांना तबल्यावर पं. सुरेश तळवळकर यांची दमदार साथ लाभली. अमेय बिच्चू यांनी (संवादिनी) साथ केली. तत्पूर्वी परामानंद रॉय यांचे बासरी वादन झाले. त्यांना यशवंत वैष्णव यांनी तबल्यावर साथ केली.
----------