पान तीन
----------------
31575
नाशिक : बसस्थानकात दागिने चोरीप्रकरणी जप्त मुद्देमाल. समवेत शहर गुन्हेशाखेच्या युनिट एकचे पथक.
बस स्थानकांवर दागिने लांबवणारी महिला जेरबंद
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. ६ : शहरासह परिसरात बस स्थानकांवर प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन बॅगेतील मौल्यवान वस्तू व सोन्याचे दागिने लांबवणाऱ्या एका सराईत महिलेलागुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने जेरबंद केले आहे. तिच्याकडून ७ लाख १२ हजार ३४४ रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. निर्मला विजय लोंढे (वय ४०, रा. बालाजी नगर, टाकळी रोड, नाशिक रोड) असे अटक केलेल्या महिला संशयितेचे नाव आहे.
गुन्हे शाखा युनिट एकचे वरिष्ठ निरीक्षक डॉ. अंचल मुदगल यांच्या मार्गदर्शनाखाली विविध पथक बसस्थानक परिसरात गस्त घालत होते. दरम्यान अंमलदार अप्पा पानवळ, राम बर्डे यांना चोरीच्या गुन्ह्यातील संशयित महिला मेळा बस स्थानक परिसरात येणार असल्याची खबर मिळाली. त्याआधारे पोलिसांनी सापळा रचून निर्मला लोंढे हिला ताब्यात घेतले. चौकशीत तिची विचारपूस केली असता, तिने शहापूर ते साक्री प्रवासादरम्यान बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन चोरी केल्याची कबुली दिली. अंगझडतीत सोन्याची चेन, मंगळसूत्र, हिऱ्याचे कानातले, नऊ खडे असलेले सोन्याचे पेन्डल आणि अंगठी असा ऐवज मिळून आला. पोलिस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, रमेश शिंदे, दत्तात्रय पोटे व युनिट एकच्या पथकाने ही कामगिरी केली.