फोटो : H31802
श्री दुर्गामाता मंदिर नवरात्रोत्सवासाठी सज्ज
आकर्षक रोषणाई अन् फुलांची सजावट; विविध कार्यक्रम
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. ९ : त्रिमूर्ती चौकातील श्री दुर्गामाता मंदिरात नवरात्रोत्सवाची तयारी पूर्ण झाली असून मंदिरावर आकर्षक रोषणाई करण्यात आल्याने मंदिर परिसर उजळून निघाला आहे. फुलांच्या अनोख्या सजावटीमुळे मंदिराचे सौंदर्य अधिक खुलले असून, आई भगवतीच्या मूर्तीला केलेल्या वज्रलेपनामुळे मूर्तीचे रूप अधिकच मनोहारी दिसत आहे.
शनिवारी (ता. १०) रात्री अकरा वाजता ध्वजारोहण करून नवरात्रोत्सवाला प्रारंभ होणार असून नवरात्रातील नऊ दिवस सकाळ-सायंकाळ महाआरती, भजन, कीर्तन तसेच विविध धार्मिक व आध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. महिला मंडळाच्या वतीने सामुदायिक दुर्गा सप्तशती पाठ पठण करण्यात येणार आहे. धनंजय जोशी, हेमंत जोशी, राहुल कुलकर्णी पौरोहित्य करणार आहेत. सामाजिक बांधिलकी जपत आधार आश्रमातील मुलींच्या हस्ते महाआरती व त्यांचे कन्यापूजन करण्यात येणार आहे. तसेच धान्य वाटपाचा उपक्रम राबविण्यात येणार आहे. कोजागिरी पौर्णिमेनिमित्त महाप्रसादाचे आयोजन केले असून, रक्तदान आणि आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात येणार आहे. सर्व देवीभक्तांनी नवरात्रोत्सवातील धार्मिक व सामाजिक उपक्रमांचा तसेच आई भगवतीच्या दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन दत्ता पाटील, समाधान जायभावे, तानाजी जायभावे, भास्कर एखंडे, धर्माजी बोडके यांच्यासह अन्य विश्वस्त, स्वयंसेवक व आयोजकांकडून करण्यात आले आहे.
--चौकट
दुष्काळामुळे पाडवा पहाट रद्द
गेल्या बारा वर्षापासून कोरोनाकाळ वगळता दरवर्षी दिवाळीमध्ये मंदिरात पाडवा पहाट सांगितिक कार्यक्रम आयोजित करण्यात येतो परंतू, यंदा दुष्काळ परिस्थितीमुळे शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्यासाठी पाडवा पहाट कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय मंदिर संस्थानच्या वतीने घेण्यात आल्याची माहिती मंदिराचे अध्यक्ष केशव अण्णा पाटील यांनी दिली. कार्यक्रमासाठी खर्च होणारा निधी व उत्सवातील अनावश्यक खर्चाला फाटा देत हा निधी शेतकऱ्यांकडे सुपूर्द केला जाणार आहे.
-----