गरब्याचा ठेका अन पांरपारिक वेशभूषेचा रंग!

गरब्याचा ठेका अन पांरपारिक वेशभूषेचा रंग!
Published on: 
फोटो : H31414 गरब्याचा ठेका अन्‌ पांरपारिक वेशभूषेचा रंग! राजकोट, जामनगरच्या कलाकुसरीची भुरळ; पारंपारिक गरबा ड्रेसला मागणी सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. ५ : गरब्याचा ठेका, दांडियाची धूम आणि त्याला साजेशी पारंपरिक वेशभूषा, नवरात्रोत्सवात गरबाप्रेमींचा उत्साह शिगेला पोहोचला असताना आता आकर्षक पारंपारिक गरबा ड्रेसला मागणी वाढली आहे. मात्र, केवळ नवरात्रोत्सवापुरता वापर होणारा ड्रेस खरेदी करण्यापेक्षा तो भाड्याने घेण्याकडे अनेकांचा कल वाढला आहे. त्यामुळे चनिया चोली, घागरा चोली, जॅकेट, केडिया, अँकल केडिया, कोटी, पगडी अशा विविध पारंपरिक वेषभूषांनी बाजारपेठेत रंग भरला आहे. गरबा आणि दांडिया खेळताना वेशभूषेला विशेष महत्त्व असते. आकर्षक रंग, पारंपरिक नक्षीकाम आणि विविध प्रकारच्या डिझायनर पोशाख गरबा प्रेमींचे लक्ष वेधून घेतात. मात्र, हे पोशाख खरेदी करण्यासाठी मोठी किंमत मोजावी लागते. त्यामुळे नवरात्रोत्सवासाठी पोषाख भाड्याने घेण्याचा पर्याय अनेकांना सोयीचा ठरत आहे. गुजरातची पारंपरिक नृत्यशैली असलेल्या गरब्याचे आकर्षण देशभरात आहे. नाशिकमध्येही विविध मंडळांच्या गरबा आणि दांडिया कार्यक्रमांना गर्दी होत असते. त्यासोबतच अनेक ठिकाणी वेशभूषा स्पर्धांचे आयोजन केले जाते. त्यामुळे या स्पर्धांमध्ये वेगळे आणि आकर्षक दिसण्यासाठी गरबा प्रेमी नवरात्रोत्सवापूर्वीच पोशाखाची तयारी करतात. गरबा ड्रेसमध्ये हाताने केलेल्या कलाकुसरीला विशेष मागणी असते. गुजरातमधील राजकोट, जामनगर आदी भागांत कपड्यांवर हाताने नक्षीकाम करणारे कारागीर आजही कार्यरत आहेत. त्यांच्याकडून पारंपरिक पद्धतीने पाेषाख तयार करून घेतले जातात. गरबा ड्रेस भाड्याने घेण्यासाठी साधारणपणे एका दिवसासाठी पाचशे ते एक हजार रुपये मोजावे लागतात. दुपारी बारा वाजता ड्रेस घेऊन गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी दहा वाजेपर्यंत तो परत करावा लागतो. गरब्याचा आनंद लुटण्याची क्रेझ दरवर्षी वाढत असल्याने भाडेतत्त्वावरील गरबा ड्रेसच्या व्यवसायालाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. --- कोट फोटो : H31413 बारा वर्षांपासून गरबा ड्रेस भाड्याने देण्याचा व्यवसाय करते आहे. कपडे भाड्याने देताना त्यांच्या स्वच्छतेला सर्वाधिक महत्त्व दिले जाते. त्यामुळे प्रत्येक ड्रेसची स्वच्छता कटाक्षाने पाळली जाते. अगदी एक वर्षाच्या बाळापासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वजण आवडीने गरबा वेशभूषा घेऊन जातात. दरवर्षी नवरात्रोत्सवात या ड्रेसला चांगला प्रतिसाद मिळत आहे. -मनाली रहाणे, रूपश्री गरबा ड्रेसेस -----
Marathi News Esakal
www.esakal.com