धुळे : टुडे पान १ साठी.. मेन
--
नवरात्रोत्सवात जिल्ह्यात वाहन खरेदी सुसाट
--
साडेचार हजार वाहनांची नोंद : ‘परिवहन’च्या तिजोरीत सहा कोटींचा महसूल
धनंजय सोनवणे : सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. २३ : जिल्ह्यात यंदा पावसाचे प्रमाण अपुरे राहिल्याने शेती आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेवर दुष्काळी परिस्थितीचे मोठे सावट आहे. शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिक आर्थिक अडचणींचा सामना करत असतानाही नवरात्रोत्सव आणि दसऱ्याच्या मुहूर्तावर नवीन वाहन खरेदी करण्याचा उत्साह नागरिकांमध्ये कायम राहिला. या कालावधीत जिल्ह्यात तब्बल चार हजार ५१० नव्या वाहनांची नोंद झाली. या सणासुदीच्या काळात जिल्ह्यात वाहन खरेदीसह सुवर्ण, वस्त्र आणि इलेक्ट्रॉनिक्स बाजारपेठेत कोट्यवधी रुपयांची उलाढाल झाल्याचे चित्र दिसून आले.
-
नवरात्रोत्सव आणि साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर शहरासह जिल्ह्यातील वाहन शोरूम्समध्ये ग्राहकांची मोठी गर्दी झाली होती. अनेकांनी आधीच वाहनांची नोंदणी करून या कालावधीत वाहन घरी नेण्याचे नियोजन केले होते. याशिवाय, ई- बाईक आणि इलेक्ट्रिक वाहनांच्या खरेदीकडे नव्या पिढीचा विशेष कल असल्याचे चित्र पाहायला मिळाले.
-
इलेक्ट्रॉनिक्सलाही झळाळी
केवळ वाहनेच नव्हे तर सोने- चांदीच्या दागिन्यांसह नाणी खरेदी करण्यासाठी सराफ बाजारात नागरिकांची तुफान गर्दी झाली होती. तसेच, मोबाईल, दूरचित्रवाणी संच, फ्रीज, वॉशिंग मशीन यांसारख्या गृहपयोगी इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंनाही ग्राहकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. सणाचा उत्साह आणि आगामी दिवाळीची चाहूल यामुळे व्यापारी वर्गात मोठे चैतन्य पसरले असून, आता सर्वांचे लक्ष आगामी दिवाळीच्या खरेदीकडे लागले आहे.
-
१४-१
..चौकट..
१४-१
साडेचार हजार नवी वाहने रस्त्यावर
उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या आकडेवारीनुसार, जिल्ह्यात एक ऑक्टोबरपासून नवीन वाहनांच्या नोंदणीतून शासकीय तिजोरीत मोठा महसूल जमा झाला. या कालावधीत तीन हजार २५२ मोटरसायकल, ६४३ चारचाकी कार, ३०६ व्यावसायिक वाहने, २५८ इलेक्ट्रिक वाहने आणि ५१ इतर वाहनांची नोंदणी झाली. या वाहन नोंदणीतून उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या तिजोरीत मोटरसायकल नोंदणीतून एक कोटी ८९ लाख ३३ हजार ३६० रुपये, चारचाकी कार नोंदणीतून तीन कोटी ३९ लाख ३० हजार १९३ रुपये, व्यावसायिक वाहने नोंदणीतून ६२ लाख १० हजार २१२ रुपये तर इतर वाहने नोंदणीतून २६ लाख २० हजार ९४८ रुपये असा सहा कोटी १७ लाख ५४ हजार ३१३ रुपयांचा महसूल जमा झाला.
-