शेतकरी ज्ञानवृद्धीसाठी निंबाळकरांचा पुढाकार
वार्सा, ता. ५ : ग्रामीण व आदिवासी भागातील शेतकऱ्यांना आधुनिक शेती तंत्रज्ञान, कृषी व्यवसाय, शेतमाल प्रक्रिया, मूल्यवर्धन, बाजारपेठ तसेच शासकीय योजनांची माहिती मिळावी, यासाठी सातत्याने कार्यरत असलेले निलेश भास्करराव निंबाळकर यांची महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत युरोप आंतरराष्ट्रीय कृषी अभ्यासदौऱ्यासाठी निवड झाली होती.
१६ ते २७ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत झालेल्या या अभ्यासदौऱ्यात फ्रान्स, जर्मनी, स्वित्झर्लंड व नेदरलँड्स या देशांना भेट देऊन तेथील आधुनिक कृषी पद्धती, तंत्रज्ञान, शेतमाल प्रक्रिया, मूल्यवर्धन आणि कृषी व्यवसायातील विविध उपक्रमांचा त्यांनी प्रत्यक्ष अभ्यास केला. आंतरराष्ट्रीय स्तरावरील कृषी क्षेत्रातील बदल, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि शेतमालाला अधिक बाजारमूल्य मिळवून देण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध पद्धतींची माहिती या दौऱ्यातून मिळाली. या माध्यमातून मिळालेले ज्ञान आपल्या परिसरातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याचा निंबाळकर यांचा प्रयत्न आहे. या आंतरराष्ट्रीय कृषी अभ्यासदौऱ्यात सहभाग घेतल्याबद्दल दि. २८ सप्टेंबर २०२६ रोजी महाराष्ट्र कृषी विभागातर्फे निलेश निंबाळकर यांना अधिकृत प्रमाणपत्र व मानपत्र प्रदान करण्यात आले. जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी सुरज जगताप यांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला.