सपकाळ फार्मसीला ‘अविष्कार’च्या
विभागीय स्पर्धेचे यमजानपद
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. ५ः विद्यार्थ्यांमधील संशोधनवृत्ती, वैज्ञानिक दृष्टिकोन, सर्जनशीलता, नवोपक्रमाला चालना देणाऱ्या ‘अविष्कार २०२६’ या स्पर्धेच्या विभागीय फेरीचे यजमानपद कल्याणी चॅरीटेबल ट्रस्ट संचलित आर. जी. सपकाळ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीला मिळाले आहे. लोणेरे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाच्या संलग्नतेखाली ही विभागीय स्पर्धा आयोजित केली जाईल.
विद्यापीठातर्फे नाशिक येथे घेतलेल्या राज्यस्तरीय कार्यशाळेनंतर आर. जी. सपकाळ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीतर्फे स्पर्धेच्या आयोजनासाठी प्रस्ताव सादर केले होते. यानंतर विद्यापीठाचे ‘अविष्कार २०२६’ स्पर्धा समन्वयक डॉ. संजय खोब्रागडे यांनी प्रस्तावाला मंजुरी दिली. विभागीय स्पर्धेत नाशिक व जळगाव विभागातील विविध महाविद्यालये व शैक्षणिक संस्था सहभागी होतील.
‘अविष्कार’च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना संशोधनाचे सादरीकरण करण्याची संधी मिळण्यासह विविध विषयांतील संशोधन, नवकल्पना आणि प्रयोगशीलतेची देवाणघेवाण करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध होते. विविध क्षेत्रांतील नावीन्यपूर्ण संकल्पना व संशोधनात्मक प्रकल्पांना या माध्यमातून प्रोत्साहन मिळणार असून, गुणवत्तापूर्ण प्रकल्पांना पुढील स्तरावरील स्पर्धेसाठी संधी उपलब्ध होईल. विभागीय स्पर्धेच्या यजमानपदाची संधी आर. जी. सपकाळ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीला मिळाल्याबद्दल संस्थेच्या व्यवस्थापनाने समाधान व्यक्त केले आहे.