सेकंड मेन
---
फाेटो - 16046
मालेगाव : रास्ता रोको आंदोलन करताना सकल हिंदू समाजाचे पदाधिकारी.
---
मोसम नदीपात्रातील अतिक्रमणाविरोधात रास्ता रोको
दोन तास आंदोलन; संयुक्त मोजणीनंतर कायदेशीर कारवाईचे प्रशासनाचे आश्वासन
सकाळ वृत्तसेवा
मालेगाव, ता. ५ : येथील कॅम्प भागात मोसम नदीपात्रात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करण्यात आले आहे. नदीपात्रातील अतिक्रमण काढावे, यासाठी सकल हिंदू समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. संबंधित हद्द महापालिकेची असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितल्यावर सप्तंत झालेल्या पदाधिकाऱ्यांनी नवीन तहसीलसमोरील मुख्य रस्त्यावर डॉ. चैतन्य देवरे यांच्या नेतृत्वाखाली दोन तास रास्ता रोको आंदोलन केले. प्रशासनाने आश्वासन दिल्यावर आंदोलन मागे घेण्यात आले.
या वेळी डॉ. चैतन्य देवरे म्हणाले, की कॅम्प भागात मोसम नदीपात्रात अतिक्रमण झाले आहे. नदीपात्रात भराव करून त्या ठिकाणी पक्की घरे बाधण्यात आली आहेत. येथील अतिक्रमण काढावे, २०११ नंतरच्या घरमालकांना नोटीस न देता त्यांचे अतिक्रमण निष्काशित करावे, आठ दिवसांत अतिक्रमण न काढल्यास जनआंदोलन छेडू, वेळ आल्यावर न्यायालयात दाद मागू, अमली पदार्थ विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, तसेच येथे ‘जय भवानी, जय शिवाजी’ यांसह विविध घोषणा देण्यात आल्या. या वेळी श्याम देवरे, चिरंजीव सानप, अजय वाघ, रवी बाबा, अक्षय काळे यांच्यासह सकल हिंदू समाज, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे पदाधिकारी उपस्थित हाेते.
रास्ता रोको आंदोलन
येथील अतिक्रमण काढण्यासाठी सुमारे दोन तास भरउन्हात आंदोलन करण्यात आले. त्यामुळे मसगा कॉलेजकडे जाणाऱ्या रस्ता बंद करण्यात आला होता. नदीपात्राची संयुक्त मोजणी करून नियमाप्रमाणे कायदेशीर कारवाई करण्याचे अतिक्रमण अधीक्षक बाळू धाेंडगे व पाटबंधारे विभागाचे उपअभियंता आर. एस. निकम यांनी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. या वेळी तहसीलदार विशाल सोनवणे, कॅम्प पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक योगेश पाटील यांच्यासह पोलिस अधिकारी उपस्थित होते.