फोटो : B10652
सातपूर : येथील रस्त्यावर साचलेला कचरा.
--
सातपूर परिसरात डासांचा वाढता प्रादुर्भाव
औषध व धूर फवारणीची नागरिकांची मागणी
सातपूर, ता. ५ : सातपूर परिसरात डासांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढल्याने नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. ठिकठिकाणी साचलेले ड्रेनेजचे घाण पाणी आणि कचऱ्याचे ढिगारे यांमुळे डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणावर होत असून, डेंगी व मलेरियासह विविध साथीचे आजार पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे महापालिकेच्या आरोग्य विभागाने तातडीने उपाययोजना करून परिसरात औषध फवारणी व धूर फवारणी करावी, अशी जोरदार मागणी होत आहे.
सातपूर परिसरातील अनेक भागांमध्ये रस्त्यांवर कचऱ्याचे मोठे ढिगारे साचले आहेत, तर अनेक ठिकाणी ड्रेनेजचे घाण पाणी रस्त्यावर येत असल्याने डासांचा उपद्रव वाढला आहे. सकाळी आणि विशेषतः सायंकाळच्या वेळी नागरिकांना या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. घरांमध्येही डासांची संख्या वाढल्याने लहान मुलांच्या व नागरिकांच्या आरोग्याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.
सध्या परिसरातील महापालिकेच्या रुग्णालयांसह खासगी रुग्णालयांमध्ये ताप, अंगदुखी व इतर आजारांच्या तक्रारी घेऊन येणाऱ्या रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. साथीच्या आजारांचा उद्रेक होण्याची शक्यता लक्षात घेता महापालिकेने डासांची उत्पत्तीस्थळे शोधून ती तात्काळ नष्ट करावीत, तसेच परिसरात नियमित व कायमस्वरूपी औषध फवारणी आणि धूर फवारणी करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.
---कोट
प्रभागनिहाय नियमित औषध फवारणी व धूर फवारणी करण्यात येत असून, डासांची उत्पत्तीस्थळे शोधून त्यावर कार्यवाही केली जात आहे. उपाययोजनांबाबत जनजागृती करण्यासाठी परिसरात स्पीकरद्वारे सूचना देण्यात येत आहेत
-नारायण जाधव,
मलेरिया विभाग
---कोट
डासांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. अनेक महिन्यापासून महापालिकेकडून धूर व औषध फवारणी होत नाही. डासांमुळे डेंग्यू, मलेरिया यांसारख्या आजारांचा धोका वाढला असून नागरिक आजारी पडत आहे प्रशासनाने केवळ तक्रारींची वाट न पाहता परिसरात नियमित धूरफवारणी व औषध फवारणी करावी.
-कमलबाई इंगळे, स्थानिक