बदलते पान मेन
----------------
31834
अभिजित पाटील
निधी वाटपात शहादा पालिकेला सावत्रपणाची वागणूक
अभिजित पाटील : १५ ऑक्टोबरला लाक्षणिक उपोषण
सकाळ वृत्तसेवा
नंदुरबार, ता. ९ : शहादा शहरातील रस्त्यांची अतिशय दुरवस्था झाली असून निधीअभावी विकास कामांना ब्रेक लागला आहे. यासाठी अडीच महिन्यांपूर्वी प्रस्ताव सादर केला असून आजपर्यंत शहादा पालिकेला कोणताही निधी मिळालेला नाही. निधी वाटपात प्रशासनाकडून शहादा पालिकेला सावत्रपणाची वागणूक दिली जात असून यामुळे नागरिक संतप्त झाले आते. प्रशासन निधी देण्यास टाळाटाळ करून सावत्रपणाची वागणूक देत असल्याने १५ ऑक्टोबरला हजारो नागरिकांसह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करणार असल्याची माहिती शहादा नगरपालिकेचे नगराध्यक्ष अभिजित पाटील यांनी दिला.
पाटील म्हणाले की, शहादा शहरातील विकास कामांसाठी ३० जुलै २०२६ ला १५ कोटी रुपयांचे प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला आहे. आम्ही सर्व ठराव पालिकेच्या सभेत एकमताने मंजूर करूनच प्रस्ताव दिले आहेत. शहादा नगरपालिका ही जिल्ह्यातील बिगर पेसा ब वर्ग नगरपालिका आहे. शहादा शहराच्या निधीबाबत लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांकडून सावत्रपणाची भूमिका घेण्यात येत आहे. लाक्षणिक उपोषणानंतरही प्रशासनाने दखल घेतली नाही तर आमरण उपोषण केले जाईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.
याबाबत पालकमंत्री हसन मुश्रीफ, खासदार गोवाल पाडवी, आमदार चंद्रकांत रघुवंशी, आमदार राजेश पाडवी, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अभिजित मोरे आणि जिल्हाधिकारी, सहआयुक्त यांच्याकडे पत्रव्यवहार करून निधीची मागणी केली आहे. शासनाकडून सुविधा मिळत नसतील तर आम्ही कर का भरावा? असा सवाल जनता करीत आहे. महाराष्ट्र शासनाकडून आमच्या समस्या सुटत नसतील तर आम्हाला गुजरात किंवा मध्य प्रदेश राज्यांमध्ये विलीन करून द्यावे, अशा संतप्त भावना नागरिक व्यक्त करत आहेत. शहरातील रस्त्यांची मोठी दुरवस्था झाली आहे. प्रकाशा, तिखोरा, वैजाली गावाजवळील पुलाचे काम अनेक वर्षापासून रेंगाळलेले आहे. परिसरातील साखर कारखाने सुरू झाल्यानंतर शेतकऱ्यांचा ऊस कारखान्यापर्यंत कसा पोहचवायचा? असा सवालही अभिजित पाटील यांनी उपस्थित केला.
----------
या नगरपंचायतींना निधी
जिल्ह्यातील धडगाव नगरपंचायतीला सुमारे ५ कोटी ८५ लाख, नंदुरबार पालिका ७ कोटी २६ लाख, तळोदा पालिका ६ कोटी ६७ लाख तर नवापूरला ५ कोटी ७६ लाख रुपयांचा निधी विकास कामांसाठी दिला आहे याव्यतिरिक्त विधान परिषदेच्या आमदारांनी १ कोटी ७५ लाखांचा वेगळा निधी दिला आहे. मात्र, शहादा शहरावर अन्याय केला जात असल्याचे पाटील यांनी सांगितले.