सेकंड मेन शक्य
NSK26H34944
जळगाव : श्रीराम रथोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रथाच्या मार्गावरील स्वच्छतेबाबत आरोग्य विभागाचे अधिकारी व बीव्हीजी कंपनीच्या प्रतिनिधीला सूचना देताना उपमहापौर मनोज चौधरी.
--
रथोत्सवाच्या मार्गाची तातडीने स्वच्छता करा
उपमहापौरांचे आरोग्य विभागाला निर्देश; कचरा, नालेसफाई, फवारणीवर भर
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. १४ : दीडशे वर्षांहून अधिक काळाची परंपरा लाभलेल्या जळगावच्या ऐतिहासिक श्रीराम रथोत्सवाच्या तयारीला वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर रथोत्सवाचा मार्ग स्वच्छ आणि सुस्थितीत ठेवण्यासाठी महापालिका प्रशासनाने हालचाली सुरू केल्या आहेत. उपमहापौर मनोज चौधरी यांनी स्वच्छतेचा आढावा घेत रथ आणि विविध वहनांच्या मार्गांची तातडीने स्वच्छता करण्याचे निर्देश आरोग्य विभागाला दिले.
जळगावच्या श्रीराम रथोत्सवाला दीडशे वर्षांहून अधिक काळाची परंपरा आहे. कार्तिक शुक्ल एकादशीनिमित्त होणाऱ्या या उत्सवात प्रभू श्रीरामाचा रथ आणि विविध वहनांच्या मिरवणुकीत हजारो भाविक सहभागी होतात. हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेल्या या सोहळ्यात भाविकांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी स्वच्छतेचे नियोजन करण्यावर बैठकीत भर देण्यात आला. बैठकीस महापालिकेच्या आरोग्य विभागाचे समीर बोरोले, बीव्हीजी संस्थेचे व्यवस्थापक रेड्डी, जाधव आणि राठोड उपस्थित होते. बैठकीनंतर उपमहापौरांनी अधिकाऱ्यांना रथोत्सव मार्गाची प्रत्यक्ष पाहणी करून स्वच्छतेच्या कामांना तातडीने गती देण्याचे निर्देश दिले. तसेच स्वच्छतेच्या कामात कोणतीही हयगय खपवून घेतली जाणार नसल्याचा इशाराही त्यांनी दिला.
चौकट
रथोत्सवाच्या दिवशी यंत्रणा सज्ज ठेवा
रथोत्सवाच्या संपूर्ण मार्गावरील कचरा तातडीने उचलणे, रस्त्यांची साफसफाई करणे, नाले व गटारींची स्वच्छता तसेच आवश्यक ठिकाणी जंतुनाशक फवारणी करण्याच्या सूचना चौधरी यांनी दिल्या. उत्सवापूर्वीच सर्व कामे पूर्ण करावीत. तसेच रथोत्सवाच्या दिवशीही स्वच्छतेसाठी स्वतंत्र यंत्रणा कार्यरत ठेवावी, असे अशा सूचना केल्या.